अखेर राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचे ऑनलाई बुकिंग सुरु

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला भेट देण्यासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु झाले आहे. अनेक दिवसांपासूनची पर्यटकांची प्रतिक्षा अखेर संपली असून रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागणार नसल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

तिकीटासाठी आता रांग लावण्याची गरज लागणार नाही. दिवाळीच्या मूहूर्तावर प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून ऑनलाइन तिकीट उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासाठी संकेतस्थळ बनविले आहे. अनेक वर्षांपासून प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची गर्दी वाढत होती. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येऊन प्राण्यांना पाहण्याचा आनंद लुटतात. मात्र, सुटीच्या दिवशी तर प्राणिसंग्रहालयाच्या खिडकीवर तासन् तास रांगा लावून तिकीट घ्यावे लागत असे, आता या त्रासातून मुक्ती होणार आहे.




तिकीट घेण्यासाठी खिडकीवर खूप गर्दी होत असे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय व्हायची. त्यामुळे आम्ही ऑनलाइनचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे घरबसल्या सर्वांना तिकीट लगेच मिळणार आहे. ते बुकिंग प्रवेशद्वारावर दाखविले की आत प्रवेश मिळेल. सोबतच तिकीट खिडकीवरही तिकीट काढता येईल. दोन्ही पर्याय खुले असल्याने आता रांगेत उभे राहून तिकीट काढण्याची वेळ पर्यटकांवर येणार नसल्याचे प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी सांगितले आहे.

पर्यटकांना https://zooticket.pmc.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन तिकीट काढता येईल. नेट बँकिंग किंवा यूपीआयचा पर्याय निवडून तिकीटाची रक्कम अदा करता येणार आहे. संकेतस्थळावर प्राणिसंग्रहालयाची संपूर्ण माहिती देण्यात आली असून कोणते प्राणी आहेत, भविष्यातील योजना काय याचीही माहितीदेखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्राणिसंग्रहालय दर बुधवारी बंद असणार त्यामुळे त्यादिवशीचे तिकीट काढता येणार नाही. तसेच अपंग व्यक्तींनी तिकीट काढण्याची गरज नसून त्यांना प्रवेश मोफत प्रवेश असणार आहे.

कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागत असल्याने चिडचिड व्हायची. मात्र, आता ऑनलाईन पर्याय उपलब्ध झाल्याने त्रास होणार नाही. त्यामुळे गैरसोय होणार नाही. मुलांसह बिनधास्त प्राणी पाहण्याचा आनंद लुटता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने