थंडीमुळे सांधे जास्त दुखताहेत? साध्या सोप्या उपायांनी मिळवा आराम

हिवाळ्यात तापमानाचा पारा घसरल्यामुळे सांधेदुखीमध्ये वाढ होत आहे. थंडीमुळे वाढणारा सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करायला हवा. याचबरोबर योग्य आहार घेतल्यास सांधेदुखी कमी करता येते, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. हिवाळ्यामध्ये सांधेदुखी कमी करण्यासाठी अनेक सोपे उपाय करता येतात. सांधेदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी नियमित व्यायामावर भर द्यायला हवा. नियमित व्यायाम केल्याने सांध्यांची लवचिकता वाढते. त्यामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.

सांधेदुखीचा त्रास असेल तर वजन नियंत्रणात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण वजन वाढल्यास सांध्यांवरील ताण वाढून त्रासही वाढतो. त्यामुळे वजन वाढू न देणे आवश्यक आहे. सांधेदुखीवर अनेक जण परस्पर वेदनाशामक औषधे घेतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेणे टाळावे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला.




याचबरोबर ओमेगा ॲसिड, अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांचे सेवन करावे. हिवाळ्यामध्ये पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे सतत पाणी प्यावे. सांधे गरम पाण्याने शेकण्यानेही सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो. थंडीमुळे सांधेदुखी वाढत असल्याने हिवाळ्यात बाहेर जाताना उबदार कपडे वापरून थंडीपासून स्वत:चे संरक्षण करावे, असे डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अमित काळे यांनी सांगितले.

सांधेदुखी टाळण्यासाठी काय कराल…

  • हिवाळ्यात बाहेर जाताना उबदार कपडे वापरा.

  • नियमित व्यायाम करून सांध्यांची लवचिकता वाढवा.

  • हिवाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण कमी असल्याने पुरेसे पाणी प्या.

  • आहारामध्ये ओमेगा ॲसिड, अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा समावेश करा.

  • सांधे जास्त दुखत असल्यास गरम पाण्याने शेकावेत.

  • डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने