थंडीत अंड्यांची मागणी वाढताच भाव कडाडले, डझनामागे किती रुपयांनी महाग?

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तापमानातील सततच्या चढउतारांमुळे थंडीचा कडाका जाणवत नसला तरी वातावरणात गारवा अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे अंड्याचे दर वाढले आहेत. साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या हंगामात ख्रिसमस, नववर्षाचा सण आणि सेलिब्रेशनचे प्रमाण जास्त असते. यंदाही हा ट्रेंड कायम असल्याने अंड्यांची मागणी वाढली आहे. घरगुती वापर, बेकरी आणि हॉटेल्सकडून अंड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सध्या मुंबईत एक डझन अंड्यांचा दर ९० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.




गेल्या आठवड्यात एक डझन अंड्यांचा दर ८० ते ८४ रुपये इतका होता. मात्र, मागणी वाढल्याने सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीला डझनभर अंड्यांचा दर थेट ६ ते १० रुपयांनी वाढून ९० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. मुंबईतील काही भागांमध्ये तर डझनभर अंड्यांसाठी ग्राहकांना ९४ रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात अंड्यांचा दर डझनमागे ९० रुपये इतका नोंदवला गेला होता. नॅशनल एग कमिटीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, अंड्यांच्या खरेदीचा डझनासाठीचा घाऊक दर हा ७८ रुपये इतका आहे. मात्र, दुकानदार सर्व खर्च धरुन एका अंडं ६ ते १० रुपयांदरम्यान विकतात. मंगळवारी १०० अंड्यांचा दर ६२० रुपयांवर जाऊन पोहोचला. नोव्हेंबर महिन्यात १०० अंड्यांचा दर ५८०, ऑक्टोबर महिन्यात ५६० आणि ऑगस्ट महिन्यात ४८० रुपये इतका होता. तर सध्या किरकोळ विक्रेत्यांकडून एक डझन अंड्यांसाठी ८४ ते ९० रुपये इतका दर आकारला जात आहे.

अंड्यांच्या भाववाढीसाठी अनेक कारणे आहेत. थंडीचा महिना असल्यामुळे अंड्यांची मागणी वाढलीच आहे. उत्तर भारतात अंड्यांची मागणी वाढवल्यामुळे हैदराबादमधून त्याठिकाणी पुरवठा वाढला आहे. त्यामुळे मुंबईत अंड्यांची टंचाई जाणवत आहे. दक्षिण भारतातील हैदराबाद, कर्नाटक आणि तामिळनाडूतून मुख्यत्त्वेकरुन मुंबईत अंड्यांचा पुरवठा केला जातो. यंदाच्या हंगामात हैदराबादमध्ये अंड्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्याचवेळी उत्तर भारतातून अंड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे मुंबईत अंड्यांची टंचाई निर्माण झाली असून त्यामुळे दर वाढले आहेत. जानेवारी महिन्यापर्यंत अंड्याच्या किंमती चढ्या राहतील. ऑनलाईन व्यासपीठावर एक डझन अंड्यांचा दर १०४ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे, अशी माहिती मुंबई एग ट्रेडर्स असोसिएशनच्या आफताब अहमद खान यांनी दिली.

अंड्याचा दर वाढल्याने गरिबांची अडचण

गरीब कुटुंबांमध्ये आहारातील प्रोटिनचा प्रमुख स्रोत म्हणून अंड्याकडे पाहिले जाते. मात्र, सध्या अंड्याचा दर खूपच वाढला आहे. एरवी मजुरांसारख्या गरीब वर्गातील लोक ५ रुपयांना मिळणारं एक अंड आणि दोन पाव खाऊन गुजराण करु शकतात. मात्र, दर वाढल्याने अंडं खाणे त्यांच्या ऐपतीला परवडणारे नाही. यापूर्वी फक्त हिवाळ्यातच अंड्यांचे दर वाढायचे. मात्र, अलीकडच्या काळात काही मोठ्या व्यावसायिकांच्या लॉबीमुळे उन्हाळ्यातही अंड्याचे दर चढेच असतात, असे जोगेश्वरीत अंडी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल्ला हनीफ धागा यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने