व्यायाम आणि पाठीचे स्नायू

पाठीच्या स्नायूंची कार्ये

पाठीचे स्नायू आपल्या कवटीच्या खालपासून सुरू होतात, ते खांद्यापासून खाली कंबरेपर्यंत पार आपल्या खुब्याच्या सांध्यापर्यंत पसरलेले असतात. हे स्नायू आपल्या फासळ्या, मणके, स्कपुला नावाची दोन हाडं इतक्या हाडांना जोडलेले असतात. साहजिकच इतक्या हाडांना जोडलेले असल्याने तिथे होणार्‍या हालचाली निर्माण करण्याचं आणि सुसूत्रीत करण्याचं काम करतात. पाठीतले स्नायू हे साधारणपणे तीन वर्गात विभागलेले असतात.




वरचा थर (सुपरफीशिएल) स्नायू: हे स्नायू प्रामुख्याने कणा ताठ ठेवण्याचं काम करतात, दोन्ही खांद्यांना मागच्या बाजूला धरून ठेवण्याचं आणि त्यामुळे मणका ताठ ठेवण्याचं काम हे करतात. यापैकी काही स्नायू हे स्कपुला नावाचं हाड आणि मणक्याचा कंबरेकडचा भाग असे जोडलेले असतात, दोन्ही बाजूने असे जोडलेले असल्याने इंग्रजी ‘V’ अक्षरासारखे दिसतात.

मधला थर (इंटरमीजीएट) थर: हे स्नायू फासळ्यांना जोडलेले असतात आणि त्यामुळे श्वासोछस्वासला मदत करतात, फासळ्यांचं आकुंचन आणि प्रसारण हे घडवून आणतात.

इनट्रनसिक स्नायू: हे सगळ्यात खोलवरचे आणि महत्वाचे स्नायू असतात. यापैकी मलटीफिडस नावाचा स्नायू हा संपूर्ण पाठीचा कणा व्यापून असतो, दोन मणक्यांमधील स्थिरता वाढवणे, एका मणक्याची दुसर्‍या मणक्यावर होणारी हालचाल नियंत्रित करणे, ही अत्यंत महत्वाची आणि क्लिष्ट कामं हा स्नायू करत असतो. या वर्गातील बाकीचे स्नायू कंबरेतून खाली वाकणे, मागे वाकणे, वळणे, वजन उचलताना, चालताना, धावताना कंबरेच्या मणक्यांना स्थिर ठेवणं आणि त्यांच्यावरचा भर कमी करण ही अत्यंत महत्वाची कामं अव्याहतपणे करतात.

पाठीचे स्नायू इतकी महत्वाची आणि क्लिष्ट काम आयुष्यभर करतात, तरी देखील बहुतांश वेळा व्यायामाच्या रुटीन मध्ये यांच्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केलं जातं, किंवा हे व्यायाम फक्त मुलं आणि माणसांनी करण्याचे व्यायाम आहेत (जे पुन्हा ही अशास्त्रीय पद्धतीने फक्त पाठ ‘आकर्षक दिसावी’ या उद्देशाने केले जातात). या स्नायूंचे योग्य व्यायाम, योग्य पद्धतीने कसे करायचे, कुणी करायचे, कुणी नाही करायचे, कुणी कमी प्रमाणात करायचे हे सविस्तरपणे पुढच्या लेखात पाहूया.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने