राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राचे कबड्डी संघ उपांत्य फेरीत

अहमदाबाद : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डीत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला संघाने गटातील तीनही सामने जिंकले, तर पुरुष संघाला अखेरच्या साखळी सामन्यात सेनादलाकडून पराभव पत्करावा लागला. महिला संघाने बुधवारी तिसऱ्या सामन्यात बिहारचे आव्हान ३६-२० असे परतवले. या सामन्यात विश्रांतीला महाराष्ट्राकडे १५-१४ अशी केवळ एका गुणाची आघाडी होती. उत्तरार्धात बदली खेळाडू म्हणून आलेल्या सायली केरिपाळेच्या बचावामुळे सामन्यात महाराष्ट्राने उचल घेतली आणि त्यानंतर पूजा यादवच्या अष्टपैलू खेळामुळे विजय मिळविला. पूजाने चढाई चमक दाखवताना बचावात पाच पकडीही केल्या. सोनाली शिंगटे, स्नेहल शिंदे यांच्या चढाया आणि अंकिता जाधवचा बचावही महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक ठरला. उपांत्य फेरीत महाराष्ट्रासमोर तमिळनाडूचे आव्हान असेल. दुसऱ्या उपांत्य लढतीत हिमाचल प्रदेश-हरयाणा आमनेसामने येतील.

महाराष्ट्राच्या पुरुष संघाला अखेरच्या साखळी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सेनादलाने महाराष्ट्रावर ४८-३८ अशी मात केली. या पराभवामुळे महाराष्ट्रासमोर आता उपांत्य फेरीत बलाढय़ हरयाणाचे आव्हान असेल. दुसरी उपांत्य लढत सेनादल आणि उत्तर प्रदेश यांच्यात होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने