…पण मी सांगितलं होतं मी पुन्हा येईन ; आम्ही करेक्ट कार्यक्रम केला – देवेंद्र फडणवीसांचं विधान!

सोलापुर:  सोलापुरमधील मंगळवेढा येथे आवताडे शुगर्स प्रथम गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळाव्यास आज(शुक्रवार) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाषणादरम्यान त्यांच्या मी पुन्हा येईन, या गाजलेल्या वाक्याचा उल्लेख केला. शिवाय, आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, असं म्हणत महाविकास आघाडीला टोलाही लगावला.उपमुख्यमंत्री फडणवीस या कार्यक्रमाती भाषणात म्हणाले, “ज्यावेळी सुधाकर परिचारक हे निवडणुकीला उभे होते आणि त्यावेळी मी एक सभा घेण्यासाठी आलो होतो. आमच्या २४ गावांना पाणी देणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजना ही मी करणार, असं त्या सभेत आश्वासन दिलं. ते आश्वासन दिल्यानंतर सरकारचं गेलं. पण मी सांगितलं होतं मी पुन्हा येईन आणि तुमची योजनाही मी पुन्हा येण्याची वाट पाहत बसली. मधल्या सरकारने फाईल सरकरवलीही नाही. पुन्हा तुमच्या आशीर्वादाने तुम्ही समाधान दादांना निवडून दिलं. पुन्हा समाधानदादांच्याही सभेत मी तेच आश्वासन दिलं की हे काम आपण करणार आणि मला अतिशय आनंद आहे. की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे सांगितलं होतं की १०६ वा द्या करेक्ट कार्यक्रम आम्ही करतो. आम्ही करेक्ट कार्यक्रम केला आणि तुमच्या आशीर्वादाने, पांडुरंगाच्या आशीर्वादाने सरकार आलं. सरकार आल्याबरोबर आपण या योजनेला मोठ्याप्रमाणात गती दिली.”

याशिवाय “येत्या काळात आपल्या राज्यातही नैसर्गिक शेतीचं मिशन आपल्याला राबवायचं आहे. शेतकरीच आपल्या शेतीसाठी आवश्यक सगळ्या गोष्टी आपल्या शेतातच तयार करेल. बाहेरून त्याला काही विकत आणावं लागणार नाही आणि याचा कुठेही त्याच्या उत्पादकतेवर परिणाम होणार नाही. उलट त्याची उत्पादकता वाढेल, अशाप्रकारचं नैसर्गिक शेतीचं एक काम आता आपण येत्या काळात सुरू करत आहोत. मला विश्वास आहे की त्यातून आमच्या शेतकऱ्याला सुजलाम, सुफलाम होण्यासाठी मोठ्याप्रमाणात मदत मिळेल.” अशीही माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने