कोल्हापूरला विमानसेवेद्वारे सर्व शहरे जोडू; ज्योतिरादित्य शिंदे

कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळावरून देशातील सर्व शहरे विमानसेवेद्वारे जोडण्यात येणार आहेत. आगामी काळात देशातील एक महत्त्वपूर्ण विमानतळ म्हणून कोल्हापूर विमानतळ नावारूपाला येईल, असा विश्वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज व्यक्त केला. कोल्हापूर- बंगळूर विमानसेवेला त्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते.ते म्हणाले, ‘‘कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज यांचा समतेचा विचार जगभरात रुजला आहे. येथील विमानतळ विकासासाठी आजवर २५५ कोटींचा निधी मंजूर केला असून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाबरोबरच विमानतळ विकासासाठी कटिबद्ध आहे.’’ केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंग म्हणाले,‘‘मराठा साम्राज्यातील महत्त्‍वाचे ठिकाण असणारे कोल्हापूर श्री अंबाबाई मंदिरासह अन्य पर्यटन स्थळांसाठीही सर्वत्र परिचित आहे. भविष्यात कोल्हापूरमधून अधिकाधिक विमानसेवा सुरु होण्यासाठी तसेच अन्य शहरांना जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.’’इंडिगोच्या कोल्हापूरमधून सुरू असणाऱ्या विमानसेवांची माहिती देऊन यापुढेही विमानसेवा देण्यावर भर देण्यात येईल, असे इंडिगोचे प्रधान सल्लागार आर. के. सिंग यांनी सांगितले. खासदार संजय मंडलिक म्हणाले, ‘‘कोल्हापूर- बंगळूर विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल. कोल्हापूर विमानतळ देशातील सर्व राज्यांना जोडण्यासाठी आणि विमानसेवेच्या माध्यमातून कोल्हापूरचा विकास साधणे आवश्यक आहे.’’खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना उद्योजक कृष्णराज महाडिक म्हणाले, ‘‘केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आजवर कोल्हापूर विमानतळासाठी महत्त्‍वपूर्ण सहकार्य केले आहे.

यापुढेही विमानतळाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील.’’ आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, ‘‘कोल्हापूर विमानतळाचा सातत्याने विकास होत असून विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगच्या कामाला गती द्यावी. कोल्हापूरच्या प्रगतीसाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया.’’दरम्यान, ही विमानसेवा कोल्हापूर येथून बंगळूरपर्यंत तसेच पुढे कोईमतूरपर्यंत असल्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे, अशी माहिती विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी दिली.व्ही. के. सिंग यांच्यासह इंडिगो एअरलाइन्सचे प्रधान सल्लागार आर. के. सिंग यांच्या हस्ते ऑनलाईन तर कोल्हापूर येथून खासदार धनंजय महाडिक (ऑनलाईन), खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे, उद्योजक कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. प्रवासी योगेंद्र व्यास यांना पहिला बोर्डिंग पास देण्यात आला.

६४ प्रवाशांचे आगमन

विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार असून आज ६४ प्रवासी बंगळूरहून कोल्हापूरला आले तर ४८ प्रवाशांनी कोल्हापूरहून बंगळूरला प्रयाण केले. सायंकाळी ठीक चार वाजून १७ मिनिटांनी विमानाचे लँडिंग झाले तर पाच वाजून पाच मिनिटांनी विमानाचे टेक ऑफ झाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने