बच्चू कडूंना किती लागलंय? तब्येतीबद्दल अपडेट

अमरावती :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघात होत आहेत. आज सकाळीच राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. त्यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.बच्चू कडू यांचा रस्ता ओलांडताना अपघात झाला आहे. दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांना मार लागला आहे. अपघातानंतर लगेचच बच्चू कडू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
कसा झाला अपघात?

अमरावती शहरातल्या कठोरा नाका परिसरातल्या आराधना चौकात आज सकाळी बच्चू कडू यांचा अपघात झाला. या चौकात एका गाडीतून दुसऱ्या गाडीत बसण्यासाठी ते जात होते. तेव्हा वेगात आलेल्या दुचाकीची धडक बसून बच्चू कडू यांना दुखापत झाली.या अपघातात त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. चार टाके पडले आहेत. तर पायालाही मार लागला आहे. बच्चू कडू यांनी आपण ठीक असल्याची माहिती दिली आहे. तर कोणीही हितचिंतकांनी भेटायला येऊ नये, असं आवाहनही केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने