निवडणुकीत पराभव झाल्यामुळं संसदेत मोठा हिंसाचार; सभागृहात घुसून आंदोलकांनी केली तोडफोड

ब्राझील:  ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी पुन्हा एकदा राजधानी ब्राझिलियामध्ये गोंधळ घातलाय. गेल्या आठवड्यात लुईझ इनासिओ लुला डी सिल्वा  यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर बोल्सोनारोंचे समर्थक आक्रमक झाले होते.यावेळी आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून काँग्रेस  राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयात प्रवेश केला. 2021 मध्ये 6 जानेवारीला अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प  यांच्या समर्थकांनीही निदर्शनादरम्यान असंच केलं होतं, त्यावेळी आंदोलकांनी यूएस कॅपिटलवर हल्ला केला होता.आताही ब्राझीलमध्ये असंच दृश्य पाहायला मिळतंय. इथं विरोधकांचा एक गट सभागृह अध्यक्षांच्या खुर्चीवर चढला आणि इथल्या साहित्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. अध्यक्षांच्या डायसवर चढून आंदोलक माईकशी छेडछाड करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर आंदोलकांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये काँग्रेस भवनात प्रवेश करण्यासोबतच आंदोलक दरवाजे आणि खिडक्या तोडताना दिसत आहेत. ते एकत्र येऊन खासदारांचे कार्यालय फोडत असल्याचंही व्हिडिओत दिसतंय. यावेळी त्यांनी बॅनर लावण्याचाही प्रयत्न केला.

आंदोलक संसद-सर्वोच्च न्यायालयात घुसले

ब्राझिलियन पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी ब्राझिलियातील थ्री पॉवर स्क्वेअरभोवती सुरक्षा घेरा तयार केला. पोलिसांनी त्यांना राष्ट्रीय काँग्रेस, प्लानाल्टो पॅलेस आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक पुढं जात राहिले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या सोडल्या, पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही.

निवडणूक निकाल स्वीकारण्यास नकार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 30 ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीत बोल्सोनारो हे प्रतिस्पर्धी दा सिल्वा यांच्याकडून पराभूत झाले. यानंतर त्यांचे समर्थक देशभरात आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वी डावे नेते लुईझ इनासियो लुला डी सिल्वा यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ते तिसऱ्यांदा ब्राझीलचे अध्यक्ष झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने