लहान मुलांना पालकाच्या भाजीचं महत्त्व पटवून देणारा ‘पॉपॉय’ झाला ९४ वर्षांचा; जाणून घ्या लाडक्या कार्टूनबद्दल रंजक गोष्टी

मुंबई: ९० च्या दशकातील मुलांचं बालपण हे खूप रम्य होतं, कारण तेव्हा तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं आणि मनोरंजनाची कमी साधनं उपलब्ध होती. याचदरम्यान ‘कार्टून नेटवर्क’ या चॅनलने त्या काळातील मुलांच्या बालपणीच्या दिवसात एक निखळ मनोरंजन आणायचा प्रयत्न केला. त्याच काही कार्टून्सपैकी एक चिरतरुण कार्टून शो म्हणजे ‘पॉपॉय द सेलर मॅन’.कित्येक मुलांना पालेभाजी खाण्याची सवय लावणारा आपल्या सगळ्यांचा लाडका पॉपॉय ९४ वर्षांचा झाला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक या कार्टूनचा चाहता होता. संकटकाळात पालकाची भाजी खाऊन शक्ति मिळवणारा आणि समोरच्या गुंडाची बेदम धुलाई करणाऱ्या पॉपॉयची आजही लोक आठवण काढतात. आज याच पॉपॉयच्या जन्मामागील काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.अमेरिकन कार्टूनिस्ट एलझी क्रिसलर सेगर यांनी पॉपॉयला जन्म दिला. ते खरे याचे जनक. त्यानंतर काही दिवसांतच हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. हे पात्र नंतर कॉमिक बुक, टेलिव्हिजन कार्टून, व्हिडिओ गेम्समध्येसुद्धा समाविष्ट करण्यात आलं. १९८० मध्ये दिग्दर्शक रॉबर्ट ऑल्टमॅन यांनी पॉपॉय या पात्रावर बेतलेला एक लाईव्ह अॅक्शन चित्रपटदेखील बनवला.पॉपॉय हे असं पहिलं कार्टून आहे ज्याची मूर्ती घडवण्यात आली. १९३७ मध्ये टेक्ससमध्ये डबा फोडून पालक खाणाऱ्या पॉपॉयची भव्य मूर्ती साकारण्यात आली. लहान मुलांना उत्तम अन्नाचे महत्त्व अगदी सोप्या आणि मजेशीर पद्धतीने पटवून देणाऱ्या पॉपॉयचे आजही भरपूर चाहते आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने