किरणोत्सवाची आता सात दिवस पाहणी

 कोल्हापूर : तीन दिवसांचा किरणोत्सव पुढे पाच दिवसांचा झाला आणि आता सलग सात दिवस किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होऊ शकतो, असा दावा अभ्यासाअंती करण्‍यात आला आहे. त्यामुळे सात दिवस मावळतीच्या सूर्यकिरणांची पाहणी केली जाईल.आज घेतलेली चाचणी यशस्वी झाली असून, किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांची शर्यत अजूनही संपलेली नाही. महापालिका प्रशासनाने हे अडथळे तत्काळ काढले तर सातही दिवस पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होऊ शकतो, अशी माहिती आज देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, किरणोत्सव अभ्यासक प्रा. मिलिंद कारंजकर यांनी दिली.महापालिका आणि देवस्थान समितीतर्फे सोमवारी (ता. २३) किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांची संयुक्तपणे पाहणी झाली. त्यानंतर काही अडथळे काढण्यात आले. पण, अजूनही काही अडथळे आहेत. ते काढावेच लागतील. मात्र, त्याबाबत अद्यापही ठोस कार्यवाही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आता महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे.तीन, पाच आणि आता सात दिवस

पूर्वी वर्षातील दोन्ही किरणोत्सव सोहळे तीन दिवसांचे व्हायचे. मात्र, ते पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे लक्षात येताच किरणोत्सव मार्गाची विविध माध्यमांतून पाहणी झाली. सूर्यकिरणांच्या तीव्रतेपासून ते हवेतील धूलिकणापर्यंत सर्वच घटकांचा अभ्यास केला. या साऱ्या अभ्यासामुळे पुढे पाच दिवसांचा किरणोत्सव सुरू झाला.आता किरणोत्सव काळात कोणत्या दिवशी कुठेपर्यंत सूर्यकिरणे पोचतील, हे सांगणेही याच अभ्यासामुळे शक्य झाले आहे. त्यानुसारच विवेकानंद महाविद्यालयाच्या टीमने किरणोत्सवाचे मॉडेल तयार केले असून, त्याचे सादरीकरणही नुकतेच झाले. त्याच्याही पुढे जाऊन किरणोत्सव सात दिवस पूर्ण क्षमतेने होऊ शकतो, असे या अभ्यासातून पुढे आले आहे. प्रा. कारंजकर यांनी केलेल्या शिफारशीनुसार येत्या काळात सात दिवस सूर्यकिरणांचा अभ्यास होईल.

सूर्यकिरणांचा प्रवास असा...

किरणोत्सवाची सात दिवस पाहणी होणार असून, आजच्या पहिल्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पोचली. सायंकाळी पाच वाजून २५ मिनिटांनी महाद्वारात, त्यानंतर दोन मिनिटांनी गरुड मंडपात किरणे पोचली. चार वाजून ४८ मिनिटांनी ती पितळी उंबऱ्यापर्यंत पोचली.नंतर सहा वाजून आठ मिनिटांनी ती गाभाऱ्यापर्यंत आली. सहा वाजून बारा मिनिटांनी देवीच्या मूर्तीचा सूर्यकिरणांची चरणस्पर्श केला आणि त्यानंतर तीन मिनिटांनी ती मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पोचली. सूर्यकिरणांची तीव्रता प्रखर आहे. मात्र, अडथळे काढले तर किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही या वेळी व्यक्त झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने