‘बिग बॉस १६’मधून बाहेर पडलेल्या सदस्याच्या पत्नीचे शिव ठाकरेवर चोरीचे आरोप, मॅनेजरनेच दिलं उत्तर, म्हणाला, “प्रसिद्धीसाठी…”

मुंबई:  ‘बिग बॉस १६’ हा शो दिवसेंदिवस रंजक होत आहे. गेल्याच आठवड्यामध्ये विकास मनकतला या घरामधून बाहेर पडावं लागलं. काही दिवसांपूर्वीच वाइल्ड कार्ड म्हणून विकासने ‘बिग बॉस १६’मध्ये प्रवेश केला. पण तो या खेळामध्ये अधिक काळ टिकू शकला नाही. घरातून बाहेर आल्यानंतर हे एलिमिनेशन धक्कादायक आहे असं त्याने विधान केलं. आता त्याची पत्नी गुंजन वालिया चर्चेत आली आहे.शिव ठाकरेवर चोरीचा आरोप
विकास घरातून बाहेर आल्यानंतर त्याच्या पत्नीने एक ट्विट केलं. यामध्ये तिने शिववर विकासचे कपडे चोरी करण्याचा आरोप केला. शिवने विकासचे कपडे व परफ्युम लपवला होता. विकास जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा शिवने त्याचं शर्ट परिधान केलं होतं. असं विकासच्या पत्नीचं म्हणणं आहे. विकासच्या पत्नीने त्याच्यासाठी पाठवलेलं शर्ट परत मिळालं नाही म्हणून शिववर आरोप केले.

शिव ठाकरेच्या मॅनेजरचं उत्तर
विकासच्या पत्नीच्या आरोपांनंतर शिव ठाकरेच्या मॅनेजरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हे आरोप फेटाळून लावले. तसेच प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे असंही त्याने यावेळी म्हटलं. शिव ठाकरेचा मॅनेजर म्हणाला, “विकास मनकतलाच्या पत्नीने शिव ठाकरेवर जे आरोप लावले आहेत त्याबाबत मी त्याचा मॅनेजर म्हणून भाष्य करू इच्छितो. कोणताही आरोप करण्यापूर्वी शोच्या टीमशी संवाद साधावा अशी मी त्यांना विनंती करतो.”“वेगळ्या पद्धतीने प्रसिद्धी मिळवण्यासाठी चाललेला हा खटाटोप खरंच लज्जास्पद आहे.” असं शिवच्या मॅनेजरने स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं. पण विकासच्या पत्नीने पुन्हा ट्वीट करत मला जॅकेट मिळालं असल्याचं सांगितलं. पण घरातील सदस्याने त्याचे कपडे परिधान केले असल्याच्या मतावर ती ठाम आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने