पोलिस भरतीला आजपासून प्रारंभ

कोल्हापूर : जिल्ह्यातील पोलिस भरतीला उद्या (ता. ३) पासून सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात ८०० उमेदवार आहेत. तीन ते सहा जानेवारीदरम्यान भरती प्रक्रिया चालणार आहे. सर्व प्रक्रिया पोलिस मुख्यालयातील मैदानावर होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज दिली.जिल्ह्यातील २४ पोलिस शिपाई पदाच्या जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी ३ हजार २१६ उमेदवार पात्र ठरले आहेत. आठशे उमेदवारांचा एक टप्पा अशा पद्धतीने प्रक्रिया राबविली जाणार आहे. उद्या पहिल्या टप्प्यात पहाटे पाच वाजता मुख्यालयात ही प्रक्रिया सुरू होईल.




विशेष म्हणजे या भरतीत बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदविली जाणार आहे. सर्व प्रक्रिया मुख्यालयातील बंदिस्त मैदानावर होणार आहे. १००, १६०० मीटर धावणे, गोळाफेक यांची चाचणी होणार आहे. छाती, उंची मोजली जाणार आहे.एकाच वेळी दोन ठिकाणी ही प्रक्रिया सुरू राहणार असल्यामुळे दुपारपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्‍वासही अधीक्षक बलकवडे यांनी व्यक्त केला आहे. पहिल्या तीन टप्प्यात सर्व पुरुष उमेदवार असतील. तर पुढील टप्प्यात महिला आणि माजी सैनिक यांची प्रक्रिया होणार आहे.प्रत्येक चाचणीवेळी संबंधित उमेदवारांच्या गुणांची, नोंदी केलेल्या मुद्यांची माहिती तेथेच जाहीर केली जाणार असल्याचेही बलकवडे यांनी सांगितले. प्रक्रियेसाठी पोलिसांचा बंदोबस्त आणि सुरक्षेसाठी, पारदर्शकतेसाठी आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने