मैत्रिणींसोबत वेळ घालवण्यासाठी 'त्याने' दिली पुण्याला येणारं विमान उडविण्याची धमकी; आता...

 पुणे: पुण्याला येणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाने उड्डाण करण्यापूर्वी बॉम्बची धमकी देणारा फेक कॉल केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी द्वारका येथील रहिवासी अभिनव प्रकाश (२४) याला शुक्रवारी अटक केली. आरोपी अभिनव ब्रिटिश एअरवेजमध्ये ट्रेनी तिकीट एजंट म्हणून काम करतो. स्पाईसजेटच्या फ्लाइटने दिल्लीहून निघालेल्या त्याच्या मित्रांना मैत्रिणींसोबत अधिक वेळ घालवता यावा म्हणून त्याने बनावट कॉल केल्याचे अभिनवने पोलिसांना सांगितले. त्याचे मित्र राकेश आणि कुणाल सेहरावत यांनी त्याला मनालीच्या सहलीवर भेटलेल्या दोन महिलांसोबत अधिक वेळ घालवता येईल अशी योजना तयार करण्याची विनंती केल्यानंतर अभिनवने हा फसवा कॉल केला.तिघांनी फ्लाइट रद्द करण्यासाठी स्पाईसजेट एअरलाइन्सच्या कॉल सेंटरमध्ये फेक धमकीचा कॉल करण्याची योजना आखली. त्यानुसार अभिनवने एअरलाइन्सच्या कस्टमर केअरला कॉल केला आणि "फ्लाइट क्रमांक SG-8938 मध्ये बॉम्ब आहे", असा संदेश दिला.स्पाइसजेट कॉल सेंटरला कॉल आल्यानंतर, एअरलाइनने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) माहिती दिली. तसेच विमानाचे विमानतळावर विलगीकरण केले. जेव्हा अभिनवला कळले की, फ्लाईटला उशीर होणार किंवा रद्द होणार तेव्हा त्याने मैत्रिणींना बोलावले. त्यानंतर आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र या प्रकरणी अभिनवला अटक झाल्याचे समजताच त्याच्या मित्रांनी पळ काढला. सध्या आरोपी फरार आहेत. पोलीस आता या दोघांचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने