नाना पटोलेंना हटवा! आशिष देशमुख यांचं काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना पत्र

नवी दिल्ली : विधानपरिषदेच्या निवडणुकीवरुन सध्या काँग्रेसमध्ये घोळ सुरु आहे. यावरुन काँग्रेसमध्ये अनेकजण नाराज आहेत. यामुळं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यामध्ये काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून नाना पटोले यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.देशमुख यांनी खर्गेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, नाना पटोले यांची जी कार्यशैली आहे त्यामुळं यापूर्वी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता तो आता काँग्रेसच्या हातातून निसटत चालला आहे. आत्ताचीच निवडणूक नव्हे तर यापूर्वीच्या निवडणुकींचा दाखला देताना पक्षातील बेबंदशाही थांबली पाहिजे अशी मागणीच त्यांनी केली आहे. जर ही बेबंदशाही थांबली नाही तर शिंदे गटाच्याही मागे पडून काँग्रेस पाचव्या क्रमांकावर ढकलला जाईल, असंही देशमुख यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.दरम्यान, राज्यातील विधानपरिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसनं सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. पण तांबे यांनी आपला मुलगा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासाठी आयत्यावेळी पक्षश्रेष्ठींशी कुठलीही चर्चा न करता उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडं सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. याप्रकारामुळं काँग्रेसची नाचक्की झाली होती, कारण पक्षात शिस्तीचा अभाव असल्याचं यावरुन दिसून आलं होतं.याप्रकरणी खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया देताना आपल्याला याबाबत काहीही माहिती नव्हतं, असं म्हटलं होतं. त्यानंतर सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी लागली होती. त्यामुळं आता पटोले यांनाच काँग्रेसच्या पिछेहाटीसाठी कारणीभूत धरुन हटवण्याची मागणी केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने