"अ‍ॅसिड पीडितेचा चेहरा दाखवून लाखो-करोडो रुपये कमावले पण.. "; NGO चे प्रताप

मुंबई: मोबाईलवर आपण अनेकदा असे रिल्स किंवा व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये काही एनजीओ गरीबी किंवा एखादा व्यक्ती आजारी आहे, तर त्याला मदत कऱण्याचं आवाहन करत असतात. मात्र ज्या पीडित लोकांचे फोटो किंवा व्हिडीओ इथे वापरले जातात, त्यांच्यापर्यंत मिळालेली मदत पोहोचत नाही, असा आरोप करण्यात येत आहे.अॅसिड हल्ल्याची पीडित असलेली रेश्मा कुरेशी हिने हा आरोप केला आहे. तिच्या नावानेही अनेक एनजीओने मदत मागितली आहे. याबद्दल रेश्माने इंडिया टुडेशी संवाद साधला आहे. आपली आर्थिक परिस्थिती इतकी खालावली आहे की, रोजचा खर्चसुद्धा सांभाळता येत नाहीये, असं रेश्माने सांगितलं. तसंच काही एनजीओनी तिचं नाव, चेहरा वापरून कोट्यवधी रुपये जमा केले, पण त्यातलं काहीच आपल्याला मिळालं नाही, असा आरोपही रेश्माने केला आहे.रेश्मा अनेक मोठमोठ्या मंचांवर आपल्या संघर्षाची कहाणी सांगत असते आणि इतरांना प्रेरणा देत असते. मात्र तिला अद्याप कुठेही नोकरी मिळालेली नाही. रेश्मा सध्या दिल्लीतल्या एका एनजीओकडेच राहत आहे. रेश्माने सांगितलं की, काही काळापूर्वी तिचे पोस्टर्स पूर्ण मुंबईत लागले होते. ती अॅसिड हल्ला झालेल्या तरुणींना मेकअप शिकवत होती. आपल्या नावावर पैसे जमा केले जात आहेत, याबद्दल आपल्याला काहीही माहित नव्हतं, असं रेश्मा म्हणाली आहे.आपल्यासारख्या अनेक पीडितांच्या नावे पैसे कमावले जातात आणि लाखो करोडो रुपये मिळवल्यानंतर सोडून दिलं जातं, असंही रेश्माने सांगितलं. गेल्या महिन्यात त्या एनजीओने आपलं ट्वीटर अकाऊंटही डिलीट करुन टाकल्याचं रेश्माने सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने