मी आता परत कधीच निवडणूक लढवणार नाही; माजी मुख्यमंत्र्यांचं डोळ्यात पाणी आणणार निरोपाचं भाषण

कर्नाटक: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी नुकतंच विधानसभेत आपलं निरोपाचं भाषण केलं. आपल्या सहकाऱ्यांना निरोप देताना त्यांनी भाजपला पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलं.यासोबतच भाजपनं त्यांना बाजूला केलं आहे का? या प्रश्नालाही येडियुरप्पांनी उत्तर दिलं. यावेळी मी निवडणूक लढवणार नसल्याचं आधीच जाहीर केलं आहे. मात्र, शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाच्या यशासाठी मी जोमानं काम करणार आहे. येत्या निवडणुकीतच नाही तर देव मला जिवंत ठेवेल तोपर्यंत मी काम करणार आहे, असंही येडियुरप्पा म्हणाले.येडियुरप्पा पुढं म्हणाले, मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी राज्याचा चार वेळा मुख्यमंत्री झालोय. इतर कोणताही नेता इतक्या वेळा मुख्यमंत्री झाला नाही किंवा त्यांना इतक्या संधीही देण्यात आल्या नाहीत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मनापासून आभारी आहे. यंदा कर्नाटक विधानसभा निवडणूक भाजपच जिंकणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांची खिल्ली उडवत येडियुरप्पा म्हणाले, बदामी हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ असताना कोलारमधून निवडणूक का लढवायचीये, याचा अर्थ काय? गेल्या पाच वर्षात तुम्ही तुमच्या लोकसभा मतदारसंघात विकासकामं केली नाहीत का? अथवा बदामीमधून तुम्हाला हरण्याची भीती वाटतेय. तुम्ही तुमच्याच मतदारसंघात काम केलं नसताना इतर लोकसभा मतदारसंघातील लोक तुमच्यावर कसा विश्वास ठेवतील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, येडियुरप्पांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा बचाव करत सरकारच्या कामाचं कौतुक केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने