पगार दहा हजार, इन्कम टॅक्सची आली 1 कोटी 14 लाखांची नोटीस

मुंबई : कल्याण येथे राहणारे चंद्रकांत वरक (वय 56) वर्षे यांना इन्कम टॅक्स विभागाकडून 1 कोटी 14 लाखांची नोटीस धाडण्यात आली आहे. निवृत्तीकडे झुकत चाललेले चंद्रकांत हे कधी हाऊस किपिंग तर कधी सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत आपला उदर निर्वाह करतात. वर्षभर कमाई करुन ही कधी एक लाख रुपयांची रक्कमही न पाहिलेल्या चंद्रकांत यांना 1 कोटीची नोटीस आल्याने त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.वरक यांचे पॅनकार्ड व कागदपत्रांचा वापर करत चीन मध्ये काही वस्तूंची खरेदी केली गेली असल्याची माहिती त्यांना आयकर विभागाकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी सरकारने लक्ष घालून माझी सुटका करावी अशी मागणी वरक यांनी शासनाकडे केली आहे.



कल्याण मधील ठाणकर पाडा परिसरात जैन चाळीत वरक हे आपल्या बहिणीसह राहण्यास आहेत. हाऊस किपिंग, सुरक्षा रक्षक तर कधी कुरिअर बॉयचे काम करत ते आपला उदरनिर्वाह करतात. या कामातून महिना काठी 10 ते 15 हजारच्या घरात मानधन जमा होत असल्याचे चंद्रकांत सांगतात. बुधवारी 1 फेब्रुवारीला चंद्रकांत यांना आयकर विभागाकडून नोटीस आली आहे.1 कोटी 14 लाखांची ही नोटीस असून ही नोटीस पाहिल्यावर चंद्रकांत यांच्या पायाखालची वाळूच सरकली. आयकर विभाग कार्यालयात धाव घेत त्यांनी याविषयी विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या पॅनकार्ड व कागद पत्रांचा वापर करत चीन मधून काही वस्तूंची खरेदी करण्यात आली आहे. त्यावरील कर भरणा केलेला नसल्याने ही नोटीस पाठविली असल्याचे त्यांनी सांगितले.तुम्ही खरेदी केली नसल्यास याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला देखील दिला असल्याचे वरक सांगतात. मी सर्वसामान्य माणूस असून मिळेल ते काम करुन उदर निर्वाह करतो. संबंधित विभाग आणि सरकारने माझी यातून सुटका करावी अशी विनंती मी केली आहे. तसेच पोलिस ठाण्यात देखील तक्रार दाखल करणार असल्याचे वरक यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने