आगामी निवडणुकांपूर्वी काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची शक्यता

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चर्चेत आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात लिहिलेल्या पत्रानंतर समोर आलेल्या काँग्रेसमधील नाराजी नाट्यासंदर्भातील अहवाल अखेर लिफाफाबंद करण्यात आला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा अहवाल अंतिम केला असल्याची माहिती समोर आली आहे. हा अहवाल २६ फेब्रुवारीला रायपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे.

दरम्यान, या अहवालामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अनेक बदल सूचविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर प्रदेशाध्य नाना पटोले यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये दोन गट पाडल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या.काँग्रेसचे विधिमंडळातील नेते बाळासाहेब थोरात यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिला त्याचबरोबर पक्षश्रेष्ठींकडे नाराजी मांडणारे पत्र देखील पाठवले होते. यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली होती. या सगळ्याची गंभीर दखल घेत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी रमेश चेन्निथला यांची याप्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्ती केली असून त्यांना याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.



या दौऱ्यावेळी रमेश चेन्निथ यांनी काँग्रेसचे माजी मंत्री, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, आमदार, खासदार यांच्या भेटी घेतल्या. दादरच्या टिळक भवनामध्ये सोमवारी त्यांनी अनेकांची मते जाणून घेतली. महाराष्ट्रातील पक्ष संघटन मजबूत आहे. आगामी निवडणुकीला प्रदेश कार्यकारिणी खंबीरपणे सामोरे जाईल, असा विश्वास चेन्निथला व्यक्त केला आहे.रायपूर येथे २६ फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे अधिवेशन आहे. त्यावेळी ते आपला अहवाल सादर करतील, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या अहवालात त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षांबाबत काही सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रातील निवडणुकांविषयीचे पक्षाचे नियोजन अहवालात मांडतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने