अदानींची तुलना थेट 'ईस्ट इंडिया कंपनी'शी; राहुल गांधी म्हणाले, अदानी संपूर्ण...

दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी अदानीशी संबंधित प्रकरणावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.टीका करताना त्यांनी अदानी समूहाची तुलना ब्रिटीश काळातील 'ईस्ट इंडिया कंपनी'शी केली आणि म्हटले की, ''या संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर येईपर्यंत. कॉंग्रेस पक्ष प्रश्न उपस्थित करत राहील.''राहुल गांधी यांनी त्यांच्या 'भारत जोडो यात्रे'ला 'तपश्चर्या' म्हटले आहे. अदानी समूहाशी संबंधित मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधत त्यांनी आरोप केला की, "अदानी संपूर्ण संपत्ती हडप करून देशाच्या विरोधात काम करत आहेत".पक्षाच्या 85 व्या अधिवेशनाला संबोधित करताना ते म्हणाले, "आम्ही संसदेत जेव्हा विचारले की पंतप्रधानांचा अदानीशी काय संबंध आहे, तेव्हा आमचे संपूर्ण भाषण कामकाजातून काढून टाकण्यात आले.आम्ही संसदेत एकदा नाही तर हजारो वेळा प्रश्न विचारू. आम्ही प्रश्न विचारणे सुरूच ठेवू, जोपर्यंत अदानीजींचे सत्य समोर येत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही."राहुल गांधी यांनी आरोप केला की, "मला अदानीला सांगायचे आहे की, त्यांची कंपनी देशाचे नुकसान करत आहे आणि देशातील संपूर्ण पायाभूत सुविधा बळकावत आहे''

ते पुढे म्हणाले, "देशाचा स्वातंत्र्यलढा ईस्ट इंडिया कंपनी नावाच्या कंपनीच्या विरोधात होता कारण त्याने देशाची सर्व संपत्ती आणि बंदरे इत्यादी काबीज केले होते. पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. हे देशविरोधी कृत्य आहे आणि असे झाल्यास संपूर्ण काँग्रेस पक्ष त्याच्या विरोधात उभा राहील."पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांवर काँग्रेस प्रश्न विचारत राहील. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर फसवे व्यवहार आणि शेअरच्या किंमतीत फेरफार केल्याचे आरोप केले होते. हे आरोप खोटे असल्याचे सांगत अदानी समूहाने सर्व कायदे आणि तरतुदींचे पालन केले असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने