अनिल परब, राहुल शेवाळे दिल्लीत एकत्र; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांचे नेते दिल्लीत ठाण मांडून आहेत. आज सकाळी कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे हे एकत्र पहायला मिळाले. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. परब आणि शेवाळे एकत्र दिसून आले यावेळी त्यांच्यात तुरळक गप्पाही झाल्याचं कळतंय. दोघेही एकमेकांसमोर आल्यानंतर पत्रकारांनीही त्यांच्याशी संवाद साधला. तसेच फोटोसाठी त्यांना एकत्र पोझही देण्यास सांगितलं. या फोटोमागे पत्रकारांचा वेगळा स्वार्थ असला तरी परब यांनी यावर कोटी केली.परब फोटोग्राफर्सना म्हणाले, आधीचेही आमचे फोटो तुम्हाला पाठवून देतो. तसंही आम्हाला कोणी विचारणार नाही. त्यावर शेवाळे यांनी मिश्किल हास्यही केलं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर परब ठाकरेंच्या गटात तर शेवाळे शिंदेंच्या गटात सामिल झाले आहेत. त्यामुळं त्यांच्या एकत्र येण्याला वेगळी राजकीय छटा होती.दरम्यान, सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेच्या १६ आमदारांच्या आपत्रतेच्या मुद्द्यावर तसेच निवडणूक आयोगानं नुकत्याच शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयावर सुनावणी पार पडली. आमदारांच्या मुद्द्याची सुनावणी उद्या पुन्हा होणार आहे. तर आयोगाच्या निकालाबाबत दोन आठवड्यांनी सुनावणी पार पडणार आहे. तोपर्यंत ठाकरेंच्या गटाला त्यांचं सध्याचं पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरता येण्यास कोर्टानं मुभा दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने