विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा उद्यापासून ‘बहिष्कार’

कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने गुरुवार (ता. २ फेब्रुवारी) पासून आंदोलन पुकारले आहे. सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार असे या आंदोलनाचे स्वरूप आहे. त्यात शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे पदाधिकारी, सदस्य असे ४५० जण सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयुक्त कृती समितीचे मुख्य संघटक मिलिंद भोसले, आनंदराव खामकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.सुधारित आश्‍वासित प्रगती योजना, सातवा वेतन आयोग, रिक्त पदांची भरती, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी चार वर्षांपासून शासनाकडे संयुक्त कृती समितीचा पाठपुरावा सुरू आहे. पण, निव्वळ आश्‍वासनाशिवाय समितीच्या पदरात काही पडलेले नाही. त्यामुळे समितीने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यातील पहिला टप्पा म्हणून २ फेब्रुवारीपासून राज्यातील विविध विद्यापीठ, महाविद्यालयांतील सुमारे ४० हजार कर्मचारी परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत, असे भोसले यांनी सांगितले. दरम्यान, या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आज दुपारी दोन वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात सेवक संघाची द्वारसभा झाली. त्यात भोसले, खामकर यांनी मार्गदर्शन केले. संजय पवार, राम तुपे, विनया कुंभार, वंदना गुरव, माधुरी कुलकर्णी,निशिकांत पलंगे उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आज चर्चा करणार

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संयुक्त कृती समितीसमवेत बुधवारी दुपारी चार वाजता मुंबईत बैठक आयोजित केली असल्याचे भोसले यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने