‘ई-फार्मसी’ तून होतोय जीवाशी खेळ

 कोल्हापूर: कमी दरात आणि घरपोच औषध मिळत नसल्याने ई-फार्मसी, ऑनलाईन औषध विक्रीचे प्रमाण वाढत आहे. मात्र, स्वतःच निदान करणे, डॉक्टरांच्या सल्ला आणि चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) शिवाय ऑनलाईन औषध घेतली जात आहे. त्यात मुदतबाह्य, भेसळयुक्त औषध मिळत असल्याचा प्रकार घडत असल्याने ई-फार्मसी रुग्णाच्या जीवाशी खेळणारी आहे. नशेसाठी वापरली जाणारी औषधे सहजपणे मिळत असल्याने एकूणच सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे ऑनलाईन औषध विक्री, ई-फार्मसीला औषध विक्रेत्यांचा तीव्र विरोध आहे.

औषधे ही आरोग्याशी संबंधित आहेत. त्यामुळे अन्न व औषध विक्री अधिनियमाअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने नियम केले आहेत. त्यांचे पालन करत नोंदणीकृत फार्मासिस्टसच्या माध्यमातून औषध दुकानांमध्ये विविध स्वरूपातील औषधांची विक्री केली जाते. प्रत्येक औषधाची दुकानांमध्ये नोंदी ठेवल्या जातात. पण, ई-फार्मसी, ऑनलाईन औषध विक्रीत काटेकोरपणे नियमांचे पालन होत नाही. सरसकट औषधे अगदी सहजपणे ई-फार्मसीद्वारे मिळतात. त्यात गुंगीची, झोपेची, गर्भपात, कामोत्तेजक, बॉडीबिल्डिंग आदींबाबतच्या औषधांचा समावेश आहे. ई-फार्मसी, ऑनलाईन औषध विक्रीचा दुरुपयोग झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. ते टाळण्यासाठी यावर बंदी घालण्याची मागणी रिटेल औषध विक्रेत्यांची आहे.ग्राहकांना सवलतीचे आमीष दाखवून ई-फार्मसी त्यांना आपल्याकडे खेचत आहे. मात्र, त्यात बनावट, मुदतबाह्य औषधे मिळत असून, त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. ते टाळण्यासाठी ग्राहकांनी नोंदणीकृत फार्मसिस्टसकडून औषधे घ्यावीत.

- दिलीप कदम, कार्यकारी संचालक, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टस‘हल्लाबोल’च्या इशाऱ्यानंतर नोटिसा

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन करत ई-फार्मसी, ऑनलाईन औषध विक्री देशात सुरू आहे. त्याबाबत संबंधितांवर कारवाई करावी यासाठी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टसने ‘हल्लाबोल’ आंदोलनाचा इशारा डिसेंबरमध्ये दिला. त्यावर औषध मानक नियंत्रक संस्थेने ई-फार्मसी, ऑनलाईन औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. या संस्थेकडून होणाऱ्या पुढील कार्यवाहीची प्रतीक्षेत असल्याचे कदम यांनी सांगितले.

‘दिल्ली, पंजाबमधून येतात औषधे’

औषध विक्रीबाबतच्या कायद्यामध्ये ई-फार्मसी, ऑनलाईन औषध विक्रीची तरतूदच नाही. तरीही देशात या पद्धतीने औषधांची विक्री सुरू आहे. दिल्ली, पंजाब, उत्तरप्रदेश, कोलकोता येथून ऑनलाईन औषधे महाराष्ट्रात येतात. या औषध खरेदीसाठी ॲप, पोर्टल अथवा वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. त्यात आजार, विकाराची माहिती, मोबाईल क्रमांक, ई-मेल, घर अथवा कार्यालयाचा पत्ता द्यावा नोंदवावा लागतो. या माहितीचा गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याचे शेटे यांनी सांगितले.

बंदी असतानाही सर्रास विक्री

एनआरएक्स म्हणजेच नशेचे औषध, कोड इन कफ सिरीफ, अल्फ्राझोलम व डायजेफाम घटक असलेली झोप, गुंगीची आणि गर्भधारणेचे निदान, गर्भपाताची औषधांच्या विक्रीस बंदी आहे. गर्भलिंग निदानाची मशीन ॲपवर खरेदी करता येते. झोपेची, गर्भपाताची औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करता येत नाहीत. पण, ई-फार्मसीद्वारे एका क्लिकवर ती मिळतात. डॉक्टरांच्या सल्ला आणि प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे घेणे म्हणजे जीवाशी खेळ करण्यासारखे आहे. त्यामुळे ई-फार्मसी, ऑनलाईन औषध विक्रीला बंदी घालण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने