एकेकाळी असलेलं आदिवासी गांव कसं झालं देशातील स्मार्ट सिटी ? कथा जमशेदपूरची !

जमशेदपूर: जमशेदपूरबद्दल कोणाला माहीती नाहीये? भारतातल्या काही प्रसिद्ध आणि प्रगत गावांमध्ये याचा उल्लेख आढळतो. आपल्या भारताचे जुने उद्योजक जमशेदजी टाटा त्यांच्या नावावरुन या गावाला हे नाव पडलं आहे.आज हे गांव आपल्या औद्योगिक प्रगतीसाठी अन् पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. देशाविदेशातून इथे पर्यटक भेट देत असतात, पण तुम्हाला माहीती आहे का एकेकाळी हे गांव झारखंडचे एक आदिवासी गांव साचकी म्हणून ओळखले जात होते.हे झारखंडच्या दक्षिणेकडील पूर्व सिंहभूम जिल्ह्याचा एक भाग आहे. जमशेदपूरची स्थापना पारशी उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्या नावाशी जोडलेली आहे. या शहराचा पाया १९०७ मध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (TISCO) च्या स्थापनेने रचला गेला.

नक्की काय काय बघण्यासारखं?

१. जुबली पार्क

हे पार्क टाटा स्टीलने ५० वर्षे पूर्ण करुन बांधले आणि रहिवाशांना भेट म्हणून दिले. २२५ एकर जागेवर पसरलेल्या या उद्यानाचे उद्घाटन १९५८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. वृंदावन गार्डनच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या उद्यानात सुमारे एक हजार जातीचे गुलाब आहेत. या उद्यानात बाल उद्यानही आहे.

२. जयंती सरोवर

पूर्वी हे ज्युबिली तलाव म्हणून ओळखले जात होते. ४० एकरांवर पसरलेला हा तलाव खास बोटिंगसाठी बनवण्यात आला आहे. या तलावाच्या मधोमध एक बेट बांधण्यात असून त्यामुळे त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. यासोबतच पर्यटक या बेटाचा वापर बोटिंग करताना आराम करण्यासाठी करतात.३. दलमा वन्‍य अभ्‍यारण्‍य

३०००फूट उंचीवर वसलेल्या आणि १९३ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या अभयारण्याचे उद्घाटन स्व.संजय गांधी यांच्या हस्ते झाले. इथे अनेक ठिकाणे खास बनवण्यात आली आहेत, जिथून पर्यटकांना हत्ती, हरीण, बिबट्या, वाघ इत्यादी वन्य प्राणी सहज पाहता येतात. याशिवाय दुर्मिळ वनसंपदा येथे पहायला मिळते.. रात्रीच्या वेळी दलमा टेकडीच्या माथ्यावरून दिसणारे टाटानगरचे दृश्य अगदी आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांसारखे दिसते.

४. डिमना झील

हे जमशेदपूर शहरापासून १३ किमी अंतरावर आहे. दलमा टेकडीच्या पायथ्याशी बांधलेला हा कृत्रिम तलाव पाहण्यासाठी वर्षानुवर्षे पर्यटक येत असतात. डिसेंबर-जानेवारी महिन्यात येथे पर्यटक खास पिकनिकसाठी येतात. हा तलाव टाटा स्टीलने जलसंधारणासाठी आणि इथल्या रहिवाशांसाठी बांधला आहे.

५. कीनन स्‍टेडियम

संपूर्ण झारखंडमधील कीनन स्टेडियम हे एकमेव आंतरराष्ट्रीय स्तराचे क्रिकेट मैदान आहे. शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या या मैदानावर आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मोहाली क्रिकेट मैदानानंतर हे सर्वात सुंदर क्रिकेट मैदान मानले जाते.

६. हुडको झील

हुडको तलाव हा जमशेदपूरमधील छोटा गोविंदपूर आणि टेल्को कॉलनी दरम्यान टाटा मोटर्सने बांधलेला एक कृत्रिम तलाव आहे. हा परिसर कंपनीने पिकनिक स्पॉट म्हणून विकसित केला आहे.

७. दुमुहानी

मरीन ड्राइव्हवर वसलेले दुमुहनी हे सुबर्ण रेखा आणि खरकाई नद्यांचा संगम आहे.

८. इतर ठिकाणी

याशिवाय, दोरवाजी टाटा पार्क, भाटिया पार्क, जेआरडी टाटा कॉम्प्लेक्स, पाटमाडा येथील लवजोडा हातीखेडा मंदिर, गोलपहारी मंदिर, भुवनेश्वरी मंदिर, सूर्य मंदिर, इत्यादी अनेक ठिकाणे आहेत जिथे पर्यटक भेट देऊ शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने