कोल्हापुरातील महाडिकांची तिसरी पिढी 'गोकुळ'च्या पराभवाचा वचपा काढणार?

कोल्हापूर:  गोकुळ दूध संघावरील महाडिकांची तीन दशकांची सत्ता सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी उलथवून टाकली आणि संघावर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आणली. त्यामुळे हातून सत्ता निसटल्याने मोठी घोर निराशा महाडिक कुटुंबियांच्या वाट्याला आल्याचे बोलले जात आहे. एकीकडे नुकतेच राज्यसभेवर वर्णी लागली असताना स्वतःच्या मतदारसंघातील हक्काचा गोकुळ दूध संघ महाडिकांच्या हातातून गेला. परंतु या आत्मचिंतनात वेळ न दवडता पराभवाचा वचपा घेण्यासाठी महाडिक कुटुंब जोमाने सक्रिय झाल्याचे त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवरून दिसून येते.खा. धनंजय महाडिक यांचे दोन्ही सुपुत्र विश्वराज महाडिक व कृष्णराज महाडिक हे कार्यरत असल्याचे दिसून येतंय. एकंदरीत सक्रिय राजकारणात या निमित्ताने महाडिक कुटुंबातील तिसऱ्या पिढीने पदार्पण केले आहे. अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अपयश पदरी पडल्यानंतर हक्काची दुसरी सहकारी संस्था असणाऱ्या राजाराम सहकारी साखर कारखान्यावरूनही आपले वर्चस्व गमावले जाऊ नये म्हणून महाडिक कुटुंबातील तिसरी युवापिढी सक्रिय झाली आहे. येत्या काही दिवसांत राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडणार आहे.सध्या राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका पार पडत आहेत. विधानसभेप्रमाणेच सहकारी साखर कारखान्याची निवडणुकही तितकीच महत्वाची समजली जाते. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्याच्याच हाती मतदार साखर कारखान्याची सत्ता देत असतात. कोल्हापुरातील 'राजाराम सहकारी साखर कारखाना' हा अशाच अनेक साखर कारखान्यांपैकी एक महत्वाचा साखर कारखाना समजला जातो. गेली तब्बल २५ वर्ष राजाराम सहकारी साखर कारखान्यावर महाडिक कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं आहे. वडील खासदार म्हणून राज्यसभेवर गेले असताना राजकारणात विश्वराज महाडिक आणि कृष्णराज महाडिक हे राजाराम सहकारी साखर कारखान्यावरील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून कसोशीने प्रयत्न करत आहेत.अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजकडे दुर्लक्ष करून महाडिक कुटुंबियांचा जनसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी खा. धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक हे पुढे सरसावले आहेत. नुकतेच सोलापूरातील भीमा सहकारी साखर कारखान्यावर विश्वराज महाडिक हे बहुमतांनी चेअरमनपदी निवडून आले. विजयाचा गुलाल भाळी लागला आणि विश्वराज महाडिक यांनी महाराष्ट्राचा दौरा करण्यास सुरुवात केली आहे.

कोल्हापूर, सोलापूर व पुणे या तिनही जिल्ह्यात युवकांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विश्वराज महाडिक सक्रीय झाल्याचे त्यांच्या भेटी दौऱ्यावरून दिसून येते. आता आगामी राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्तानेही विश्वराज महाडिक हे अनेक गाठीभेटी घेत आहेत. आपले वडील आणि दोन भाऊ समाजकारणात सक्रिय होत असताना घरातील एकूणच सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याचे काम पृथ्वीराज महाडिक करत आहेत. त्याचबरोबर महाडिक परिवाराचे एकूणच सगळे व्यवसाय बघण्याचे काम देखील पृथ्वीराज महाडिक करत आहेत.विश्वराज महाडिक यांचे धाकले बंधू कृष्णराज महाडिक यांनीदेखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या माध्यमातून आज जगभरातील अनेक मराठी सोशल मिडीया वापरकर्ते हे कृष्णराज महाडिक यांचे चाहते झाले आहेत. काही दिवसांपूर्वी कृष्णराज महाडिक यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.सोलापूरच्या भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक व सामाजिक उपक्रमात कार्यरत असणारे कृष्णराज महाडिक ही महाडिक कुटुंबाची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात आली असली तरी, गोकुळ दूध संघाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी व राजाराम सहकारी साखर कारखान्यावरील सत्ता कायम ठेवण्यासाठी महाडिक कुटुंबातील ही युवापिढी किती यशस्वी ठरते हे येणारा काळच सांगेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने