मुंबई: आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादचा 14 धावांनी पराभव करत हंगामातील विजयाची हॅट्ट्रिक लगावली. मुंबईने हैदराबादसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हैदराबादचा संपूर्ण संघ 178 धावात माघारी परतला. मुंबईकडून बेहरेनडॉर्फ, पियुष चावला आणि मेरेडिथ यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. मात्र सामना संपता संपता अर्जुन तेंडुलकरने घेतलेली भुवनेश्वर कुमारची विकेट चर्चेचा विषय ठरली.विशेष म्हणजे अर्जुन तेंडुलकरची ही आयपीएल इतिहासातील पहिलीच विकेट होती. आपल्या दुसऱ्याच आयपीएल सामन्यात अर्जुन तेंडुलकरने 2.5 षटकात 18 धावा देत एक विकेट घेतली. त्याने पॉवर प्ले आणि डेथ ओव्हरमध्ये देखील गोलंदाजी केली. हैदराबादला विजयासाठी 20 धावांची गरज असताना रोहितने त्याच्याकडे चेंडू सोपवला. त्यानेही रोहितला निराश न करत मुंबईचा तिसरा विजय निश्चित केला.
दरम्यान, अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमधील आपली पहिली विकेट घेतल्यानंतर वडील सचिन तेंडुलकरने खास प्रतिक्रिया दिली. सचिन तेंडुलकरने ट्विट केले की, 'मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा अष्टपैलू कामगिरी केली. कॅमेरून ग्रीनने फलंदाजी आणि गोलंदाजीतही चमक दाखवली. इशान आणि तिलक वर्माने चांगली फलंदाजी केली. आयपीएल आता दिवसेंदिवस खूप रंजक होत आहे. खूप चांगल सुरू आहे मुलांनो... आणि अखेर तेंडुलकरच्या नावावर आयपीएल विकेट नोंदवली गेली!'सचिन तेंडुलकरने 78 आयपीएल सामने खेळले आहेत. मात्र त्याला एकाही सामन्यात विकेट घेण्यात यश आले नव्हते. अखेर अर्जुन तेंडुलकरने आपल्या दुसऱ्याच आयपीएल सामन्यात पहिली विकेट घेतली. त्यामुळे जे सचिन तेंडुलकरला आयपीएलमध्ये जमले नाही ते अर्जुन तेंडुलकरने करून दाखवले. हीच बाब सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटद्वारे अधोरेखित केली.