बंगळूर : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या, बोम्मई यांच्याबाबतच्या विधानावरून भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सिद्धरामय्या यांनी समस्त लिंगायत समाजाचा अपमान केल्याचा उलटवार भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.कर्नाटकात लिंगायत मुख्यमंत्री हवा अशी मागणी जोर धरत असल्याबद्दल पत्रकारांनी सिद्धरामय्या यांना विचारले असता त्यांनी, ‘‘कर्नाटकचे मुख्यमंत्री लिंगायतच आहेत आणि ते राज्यातील सर्व भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू आहेत’’ असे विधान केले होते. यावरून आता बोम्मई यांनी सिद्धरामय्या यांच्यावर टीका केली आहे.
‘सिद्धरामय्या यांनी समस्त लिंगायत समाजाचाच अपमान केला आहे असा आरोप बोम्मई यांनी केला आहे. बोम्मई म्हणाले की, ‘‘एका माजी मुख्यमंत्र्याने अशा पद्धतीने वक्तव्य देणे योग्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार समस्त लिंगायत समाजच भ्रष्टाचारी आहे. मागे ब्राह्मण समुदायाला देखील अशाच पद्धतीने अपमानित करण्यात आले होते. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री असताना अशाच पद्धतीने लिंगायत वीरशैव समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. आता राज्यातील जनताच त्यांनी धडा शिकवेल.’’दरम्यान, भाजपने आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. ‘या पूर्वी अनेक प्रामाणिक लिंगायत मुख्यमंत्री झाले आहेत आणि मी त्यांचा सन्मान करतो,’ असे सिद्धरामय्या म्हणाले. मी केवळ बोम्मई यांच्या संदर्भात बोललो होतो असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या जगदीश शेट्टर यांनी देखील बोम्मई यांच्यावर टीका केली आहे. अनेक लिंगायत नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपला ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हे सर्व का आठवले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजप या विषयाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.