शहरात १५ ठिकाणी गळतींची डोकेदुखी

कोल्हापूर : उन्हाचा तडाखा वाढला असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. अशा अवस्थेत पंप नादुरुस्त, पातळी कमी झाली, महावितरणची दुरुस्ती याबरोबरच ठिकठिकाणी असलेली गळती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची मोठी डोकेदुखी ठरत आहे. शहरात विविध ठिकाणी १५ मोठ्या गळती असून त्यातून दररोज सात ते आठ लाख लिटर पाणी वाया जात आहे.या गळती दुरुस्त केल्यास शहरातील एखाद्या मोठ्या भागाला व्यवस्थित पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळेच पाणीपुरवठा विभागाने गळती शोधून दुरुस्तीची मोहीम राबवली आहे.शहरातील पाणीपुरवठ्यासाठी शिंगणापूर, बालिंगा योजनेतून पुरवठा केला जातो. यातील काही वितरण वाहिन्या जुन्या आहेत, तर मंगळवार पेठ, शिवाजी पेठसारख्या भागात संस्थानकालीन पाईप आहेत.त्यामुळे पाणी गळती ही महापालिकेची मोठी समस्या आहे. जुन्या वाहिन्यांवरील गळती शोधण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे. मंगळवार पेठेतील पाण्याच्या खजिन्यापासून मिरजकर तिकटीकडे रस्त्याखालून जाणाऱ्या वाहिनीला गळती आहे; पण विभागाला ती गळतीच सापडलेली नाही. तशीच चंबुखडीवरून शिंगणापूर नाक्याकडे जाणारी वाहिनी, आयटीआय हॉस्टेलजवळ, फुलेवाडी रिंगरोड, सुर्वेनगर रस्ता, आपटेनगर चौक, निर्माण चौक ते हॉकी स्टेडियम चौक, हॉकी स्टेडियम ते रामानंदनगर चौक, पुईखडी जलशुद्धीकरण केंद्र,रायगड कॉलनी अशा अनेक ठिकाणच्या गळती दुरुस्त झालेल्या नाहीत. त्यातील बालिंगा जलशुद्धीकरण केंद्र, पुईखडी केंद्र तसेच रिंगरोडवर अशा विविध ठिकाणच्या गळती मोठ्या आहेत. पाणी उपशापैकी जवळपास आठ लाखांपर्यंत पाणी गळतीतून वाहून जात आहे. पुईखडीसारख्या ठिकाणी गळतीचे पाणी बाहेर काढण्यासाठी पाईप लावला आहे. हा प्रकार म्हणजे शहर उपाशी व गटारे तुपाशी असा झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने