कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन कोकणात मोठा संघर्ष पाहिला मिळत आहे. रिफायनरीला असलेला स्थानिकांचा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. त्यातच सर्वेक्षणाला विरोध दर्शवण्यासाठी गेलेल्या स्थानिक महिला आणि पुरुशांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे.राजू शेट्टी म्हणाले की, पोलिसांनी महिलांवर केलेला लाठीचार्ज संतापजनक आहे. यावर गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा. एकतर अत्यंत ऊन आहे. या उन्हात महिला-पुरुषांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण कऱण्यात आली. तसेच त्यांच्यावर उपचार न करता पोलिसांनी लोकांना तसंच सोडून दिलं. हे अत्यंत संतापजनक आहे.
परवा देखील महिलांना दगडांमधून फरफटन नेले होत. महिलांचा आक्रोश पाहून यांना पाझर फुटला नाही, असंही शेट्टी म्हणाले.दरम्यान बारसू येथील महिलेचा मोबाईल घेतला. पोलिस तिथं कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी गेले की, चोऱ्या करण्यासाठी गेले, असा सवाल शेट्टी यांनी केला. सरकारने आगीशी खेळू नये. तुमची तशी परिस्थिती नाही. अजुनही वेळ गेलेली नाही. स्थानिकांना आणि शेतकऱ्यांना नको असेल तर रिफायनरी आम्ही लादणार नाही, अशी घोषणा करा. जे तुम्हाला शिव्या देत आहेत, ते तुमचा जयघोष करतील, असंही शेट्टी यांनी शिंदे सरकारला खडसावून सांगितलं.