लष्करानं केलेल्या हवाई हल्ल्यात 100 लोक ठार; शाळकरी मुलं, महिलांचा समावेश!

म्यानमार: लष्करानं मंगळवारी मध्य म्यानमारमध्ये नागरिकांच्या जमावावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल 100 जण ठार झाले आहेत.लष्करी राजवटीच्या विरोधकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी हे लोक जमले होते. लष्करानं फेब्रुवारी 2021 मध्ये आंग सान स्यू की निवडलेल्या सरकारला उलथून टाकलं आणि तेव्हापासून या राजवटीच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी वारंवार हवाई हल्ले करण्यात येत आहेत.सत्तापालट झाल्यापासून सुरक्षा दलाच्या कारवाईत म्यानमारमध्ये 3,000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. म्यानमारच्या लष्करानं नागरिकांवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा संयुक्त राष्ट्रसंघानं  तीव्र निषेध केलाय.संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी नागरिकांविरुद्ध लष्कराची मोहीम बंद करण्याचं आवाहन केलंय, तसंच जबाबदार व्यक्तींना अटक करण्याची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी एक निवेदन जारी करून म्हटलंय, हवाई हल्ल्याचं वृत्त अत्यंत अस्वस्थ करणारं आहे. पीडितांमध्ये शाळकरी मुलं आणि उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेल्या नागरिक यांचा समावेश आहे. दुसरीकडं, लष्करानं नागरिकांवर अत्याचार केल्याच्या आंतरराष्ट्रीय आरोपांचं खंडन केलंय. त्यांनी सांगितलं, 'आम्ही देशाला अस्थिर करण्यासाठी लढणाऱ्या दहशतवाद्यांशी लढत आहे.'हेलिकॉप्टरमधून गोळीबार करण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. उद्घाटन समारंभासाठी सुमारे 150 लोक जमले होते. मृतांमध्ये महिला आणि 20 ते 30 मुलांचा समावेश आहे. मारल्या गेलेल्यांमध्ये सरकारविरोधी सशस्त्र गट आणि इतर विरोधी संघटनांचे नेते होते. सुरुवातीला 50 लोक मारले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु आता ही संख्या 100 च्या आसपास पोहोचली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने