आशियाई चॅम्पियन्स हॉकी पहिल्यांदा भारतात होणार

चेन्नई : भारतामध्ये पहिल्यांदाच आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. चेन्नईमध्ये ३ ते १२ ऑगस्ट या दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. चेन्नईमध्ये तब्बल १६ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय लढती खेळवण्यात येणार आहेत.तामिळनाडूचे क्रीडामंत्री उद्ययानिधी स्टॅलीन याप्रसंगी म्हणाले, चेन्नईमध्ये याआधी स्थानिक व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे चेन्नईला दक्षिण भारतातील हॉकी या खेळाचे माहेरघर म्हणून ओळखले गेले. आता आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करायला मिळत आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे.

पाकच्या सहभागावर प्रश्‍नचिन्ह

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पाकिस्तान व चीन या दोन देशांचा सहभाग अद्याप निश्‍चित झालेला नाही. याबाबत आयोजकांकडून सांगण्यात आले की, पाकिस्तान व चीन या दोन्ही देशांच्या या स्पर्धेतील सहभागाबाबत २५ एप्रिलपर्यंत निश्‍चित माहिती मिळणार आहे. तसेच पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत सहभागी झाल्यास त्यांना पुरेशी सुरक्षा पुरवण्यात येणार आहे, असे आश्‍वासनही या वेळी देण्यात आले.भारत, पाकिस्तान सर्वाधिक वेळा विजेते

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे पहिल्यांदा आयोजन २०११ मध्ये करण्यात आले. तिथपासून सहा वेळा ही स्पर्धा पार पडली आहे. भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या देशांनी सर्वाधिक प्रत्येकी तीन वेळा ही स्पर्धा जिंकण्याची किमया साधली आहे. २०२१ मध्ये झालेली अखेरची स्पर्धा दक्षिण कोरियाने जिंकली. भारताने ही स्पर्धा २०११, २०१६ व २०१८ (पाकिस्तानसोबत संयुक्त विजेते) या वर्षी जिंकली.

आतापर्यंतच्या स्पर्धांचे आयोजन स्थळ

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी सहा विविध स्थळी पार पडली आहे. २०११ मध्ये ही स्पर्धा चीनमधील ओर्डोस येथे खेळवण्यात आली. २०१२ मध्ये कतार येथील दोहामध्ये स्पर्धा पार पडली. २०१३ मध्ये जपान, २०१६ मध्ये मलेशिया, २०१८ मध्ये ओमान व २०२१ मध्ये बांगलादेशमध्ये ही स्पर्धा झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने