मला नरडं आहे, त्यांना गळा...; अमृता फडणवीसांच्या 'त्या' विधानावर सुषमा अंधारेंची खोचक टीका

मुंबई:  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल (बुधवार) झालेल्या मुलाखती दरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या मला माझ्यासारख्या वाटायच्या असं वक्तव्य केलं. या वक्तव्यावरून सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत अमृता फडणवीस यांच्या त्या वक्तव्याचा खपपूस समाचार घेतला आहे.

सुषमा अंधारेंच्या पोस्टमध्ये काय आहे?

सुषमा अंधारेंनी फेसबुकवर लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "अमृता वहिनींना मी त्यांच्यासारखे वाटते असं त्या जाहीरपणे एका मुलाखती दरम्यान म्हणाल्या. मी सतत विचार करत होते की मी त्यांना कोणत्या अँगलने त्यांच्यासारखी वाटत असेल बरं? ...कारण दिसायला तर त्या निश्चितपणे माझ्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. श्रीमंत ही आहेत. बाकी मला नरडं आहे त्यांना गळा आहे. मग काय साधर्म्य असेल आमच्यामध्ये?" असे प्रश्न त्यांच्या या पोस्टमध्ये विचारत आहेत.पुढे त्यांनी लिहीलं की, "मग मला कधीतरी वाटलं की कदाचित भाषा प्रभुत्व हे दोघीतलं साम्य असेल का? पण छे! कालची मुलाखत आणि त्यातलं त्यांचं कॉन्टिनेन्टल उच्चारात मराठी ऐकलं अन् खात्री पटली की आमच्यात साम्य असे काहीच असु शकत नाही." असं अंधारे त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.राज ठाकरेंनाही टोला...

इतकेच नाही तर सुषमा अंधारे यांनी मराठी भाषेचे पाईक म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे आहे. अमृता फडणवीसांची मराठी ऐकून त्यांना देखील कानात शिसे ओतल्यासारखं वाटलं असेल असं अंधारे म्हणाल्या आहेत.त्यांनी लिहीलं की, "पण त्या ही पेक्षा मराठी मनाचे मानबिंदू असणारे, मराठी भाषेचे पाईक, मराठी वाचवा चा ध्यास घेणारे, वेळप्रसंगी मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ ची पुस्तके सुध्धा मराठीत व्हावीत यासाठी कृष्णकुंजचे रान हादरवणारे राजदादा यांना, मी बोल्ली, मला चान्स मिळाली, या टाईपच मराठी ऐकुन कानात शिसं ओतल्यासाखं झालं असेल..."

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या..

एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका मंचावर आले होते. यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेत त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. यावेळी सुषमा अंधारे या मला आधी माझ्यासारख्या स्पष्टवक्ता वाटायच्या. त्या कोणाला घाबरायच्या नाहीत. जे आहे ते बोलायच्या. पण आता त्यांना जी स्क्रिप्ट मिळते तसे बोलतात. आज त्या त्या राहिल्या नाहीत, त्यांच्या पुढे एक मास्क आहे ज्यामधून त्या बोलतात असे अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने