कोलकाता विजयी हॅट्‌ट्रिकसाठी सज्ज

कोलकता : रिंकू सिंगच्या अफलातून खेळीमुळे संपूर्ण संघाचा आत्मविश्वास वाढलेल्या आणि नवसंजीवनी मिळालेल्या कोलकता नाईटरायडर्सचा सामना उद्या तुलनेने दुबळ्या असलेल्या हैदराबाद संघाविरुद्ध होत आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये सलग तीन सामने जिंकून हॅटट्रिक करण्याची संधी माजी विजेत्या कोलकता संघाला मिळणार आहे.कोलकता संघाची यंदाच्या स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली होती; मात्र त्यानंतर दोन सामन्यात विजय मिळवताना त्यांना दोन अनपेक्षित हिरो गवसले आहेत. बंगळूरविरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरने फलंदाजीत कमाल केली होती. त्याच्या २९ चेंडूतील ६८ धावांच्या खेळीमुळे कोलकताने ८१ धावांनी स्पर्धेतला पहिला सामना जिंकला होता.



त्यानंतर गुजरातविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूपर्यंत त्यांचा पराभव निश्चित होता; परंतु पुढच्या पाच चेंडूंत पाच षटकार मारून रिंकून सिंगने संघाला अनपेक्षित विजय मिळवून दिला. गतविजेत्यांना पराभूत केल्यामुळे कोलकता संघ सध्या विजयी अश्वावर स्वार झाला आहे. अशा परिस्थितीत उद्या हैदराबाविरुद्ध विजय मिळवणे त्यांना कठीण जाणार नाही, असे चित्र आहे.मुख्य कर्णधार श्रेयस अय्यर आणि बांगलादेशचा अष्टपैलू शकिब अल हसन यांच्या अनुपस्थितीत कोलकता संघ कमजोर झाला अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यातच ‘पॉवर हिटर’ आंद्र रसेल आणि हंगामी कर्णधार नितीन राणा हेसुद्धा अपयशी ठरत आहेत. अशा परिस्थितीत कोलकता संघाला अनपेक्षित हिरो सापडत असल्याने हा संघ आता धोकादायक ठरत आहे. शार्दुल आणि रिंकू सिंग यांच्यामुळे त्यांची फलंदाजी खोलवर झाली आहे आणि कोणत्याही स्थितीत सामना जिंकून देण्याची क्षमता आता वाढली आहे.रसेलने पहिल्या सामन्यात १९ चेंडूत ३५ धावा केल्यानंतर पुढच्या दोन सामन्यांत संघाला गरज असताना तो ० आणि १ एवढ्याच धावा करू शकला होता. उद्या शुक्रवारी होणाऱ्या सामन्यासाठी त्याने आज नेटमध्ये कसून सराव केला त्यामुळे हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट तळपण्याची शक्यता आहे.

सलामीचा प्रश्न

गत स्पर्धेतही कोलकता संघाने सलामीच्या जोडीत अनेक प्रयोग केले होते. त्याचा फटका त्यांना बसला होता. यावेळीही तीन सामन्यात दोन वेगवेगळ्या जोड्या खेळवल्या. उद्याच्या सामन्यात रेहमतुल्ला गुरबाझऐवजी इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जेसन रॉयला संधी मिळू शकते. शकिब अल हसनचा बदली खेळाडू म्हणून रॉयची निवड करण्यात आली आहे.एडन मार्करम कर्णधार असलेल्या हैदरबाद संघात हॅरी ब्रुक, मयांक अगरवाल आणि हेन्रिक क्लासेन असे फलंदाज असल्याने कागदावर तरी त्यांची फलंदाजी सरस दिसत आहे. प्रत्यक्ष मैदानावर मात्र त्याचे रूपांतर त्यांना करता आलेले नाही. राहुल त्रिपाठीच्या ४८ चेंडूतील ७४ धावांमुळे हैदराबादने पंजाबचा पराभव करून यंदाच्या स्पर्धेतला पहिला विजय मिळवला होता; मात्र उद्याची लढाई त्यांच्यासाठी सोपी नसेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने