नवी दिल्ली: नेमबाजी खेळामध्ये बदल करण्यात आला आहे. सुवर्णपदकासाठी दोन खेळाडूंमध्ये लढत होत होती; पण आता असे होणार नाही. अंतिम फेरीत पोहोचलेल्या आठ नेमबाजांमध्ये होणाऱ्या २४ शॉटच्या फेऱ्यांपैकी १२ फेरीनंतर एकेक खेळाडू बाद होत जाणार आहेत. अखेरचे दोन खेळाडू शिल्लक राहिल्यानंतर त्यामध्ये सुवर्णपदक व रौप्यपदक विजेता ठरला जाईल. आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेकडून या बदलाला मान्यता देण्यात आली आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये याच नियमाचा अवलंब करण्यात येत होता.टोकियो ऑलिंपिकनंतर नेमबाजीच्या नियमात बदल करण्यात आले होते. पात्रता फेरीनंतर अंतिम फेरीसाठी आठ खेळाडूंची निवड होत होती; मात्र अंतिम फेरीत अव्वल ठरणारे दोन नेमबाज सुवर्णपदकासाठी लढत होते. १६ गुणांची ही लढत असायची. आता हा नियम रद्द करण्यात आला आहे.बाकू येथे ८ ते १५ मे या दरम्यान जागतिक नेमबाजी स्पर्धा होणार आहे. नवा नियम या स्पर्धेपासून लागू होणार आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्येही (२०२४) याच नियमाचा अवलंब करण्यात येणार आहे.
जास्त बदल करण्याची गरज नाही - दीपक दुबे
भारतीय रायफल संघाचे प्रशिक्षक व व्यवस्थापक दीपक दुबे या नियमाबाबत म्हणाले, पिस्तुल व रायफल या प्रकारात खेळणाऱ्या नेमबाजांचा नव्या नियमासह सराव सुरू करण्यात येणार आहे. दिल्ली येथे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये नेमबाजांना याबाबत धडे देण्यात येतील. पुढील राष्ट्रीय स्पर्धांसाठीही याच नियमाचा अवलंब करण्यात येणार आहे. नव्या नियमासाठी खेळाडूंना जास्त काही बदल करण्याची गरज नाही, असे पुढे त्यांनी सांगितले.
असा असेल नवा नियम
- अंतिम आठ नेमबाजांमध्ये पाच सामन्यांच्या दोन फेऱ्या
- त्यानंतर १४ शॉटच्या फेरी
- एकूण २४ शॉटनंतर अंतिम विजेता ठरणार
- १२ शॉटनंतर पहिला नेमबाज बाद होणार
- ही प्रकिया त्यानंतरच्या दोन शॉटनंतर कायम राहणार