दीर्घकालीन दुष्काळामुळे सिंधू संस्कृतीचा ऱ्हास

नवी दिल्ली : दीर्घकाळ पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे ऐतिहासिक सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा, असा अंदाज संशोधकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. उत्तराखंडमधील गुहांमध्ये आढळून आलेल्या अतिप्राचीन खडकांचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे.या दुष्काळाचा कालावधी साधारणपणे ४ हजार २०० वर्षांपूर्वी सुरू झाला असावा, पुढे तो दोन शतकांपर्यंत कायम राहिला असावा असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. ‘जर्नल कम्युनिकेशन अर्थ अँड एनव्हायरोन्मेंट’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.या संशोधनामध्ये दीर्घकाळ पडलेल्या तीन दुष्काळांचा अभ्यास करण्यात आला होता, त्यांचा कालावधी हा साधारणपणे २५ ते ९० वर्षे एवढा असावा असे नमूद करण्यात आले आहे. आमच्या हाती आलेल्या पुराव्यांमधून हे स्पष्टपणे दिसून येते की, दुष्काळाचा कालावधी हा अल्प नव्हता. पर्यावरणीय परिस्थितीमध्ये वेगाने बदल झाले होते त्याचा सिंधूकालिन लोकांना मोठा फटका बसला असे ‘युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज’मधील संशोधक कॅमेरॉन पेतराई यांनी सांगितले.असा झाला अभ्यास

संशोधकांनी स्टॅलाग्माईट या खडकावरील विविध थरांच्या वाढीचा अभ्यास केला होता त्यातून पर्जन्यवृष्टीचा वेध घेण्यात आला. हा खडक गुहेमध्ये आढळून आला होता. उत्तराखंडच्या पिठोरागड येथील गुहेतून या खडकाचे नमुने गोळा करण्यात आले होते.संशोधकांनी ऑक्सिजन, कार्बन आणि कॅल्शियमसारख्या घटकांचेही मोजमाप केले होते यातून तेव्हाच्या पर्जन्यवृष्टीचा अंदाज घेण्यात आला. दुष्काळाच्या कालावधीचा निश्चित वेध घेण्यासाठी युरेनियममचा वापर करण्यात आला होता.आमच्या हाती तुकड्या तुकड्यांमध्ये आलेल्या पुराव्यांना एकत्र करून आम्ही दुष्काळाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला होता, त्यातून आम्हाला तेव्हाच्या दुष्काळाची तीव्रता लक्षात आली, असे संशोधक अॅलेना गिईशे यांनी सांगितले. वैश्विक तापमानवाढीचे मानवजातीवरील परिणाम जाणून घेण्यासाठी हे संशोधन खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असेही पेतराई यांनी सांगितले.

अतिरिक्त माहिती महत्त्वाची

या संशोधनामुळे सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाचा बदलत्या वैश्विक तापमानाशी देखील जवळचा संबंध असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत हा दुष्काळ नेमका कधीपर्यंत आणि कितीकाळ पडला याबद्दल गूढ होते, ते आता उलगडण्यात यश आले आहे. सांस्कृतिक स्मृतीचा विचार केला तर ही अतिरिक्त माहिती खूप महत्त्वपूर्ण असून वातावरणामध्ये बदल होत असताना लोकांनी नेमक्या कशा पद्धतीने त्यांचा स्वीकार करावा हे यातून स्पष्ट होऊ शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने