महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेवरून अजित पवार आक्रमक; CM शिंदेंना पत्र पाठवून म्हणाले...

मुंबईः नवी मुंबईतल्या खारघर येथे राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाला लाखो श्री सेवकांची उपस्थिती होती. मात्र कडाक्याच्या उन्हाने अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.मात्र आतापर्यंत १३ श्री सेवकांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून चौकशी कऱण्याची मागणी केली आहे.अजित पवार यांनी पत्रात म्हटलं की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटना ही सरकार निर्मित आपत्ती होती.या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करा, अशी मागणी अजित पवार यांनी पत्रात केली आहे.नियोजनशुन्य आयोजनामुळेच निष्पाप लोकांचा बळी गेल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं. तसेच दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कऱा असंही पत्रात नमूद केलं आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच हे वृत्त आलं आहे.दुसरीकडे, खुद्द आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, श्री सेवकांचा परिवार देशभर पसरला आहे. काल घडलेला प्रकार अतिशत दुर्दैवी आहे. त्याचं राजकारण करु नका.हे संकट माझ्या कुटुंबावर आलेलं संकट आहे. श्री सदस्यांची एकमेकांसोबत राहण्याची परंपरा आहे. माझे दुःख हे व्यक्त करण्यापलीकडचे आहे. आम्ही कायम आपद्ग्रस्तांसोबत आहोत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने