खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाड दौऱ्यावर; काय आहे कारण?

दिल्ली: मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर आणि संसदेचं सदस्यत्व गमावल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच त्यांचा संसदीय मतदारसंघ वायनाडला   भेट देत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही असणार आहेत.राहुल गांधी त्यांचा लोकसभा मतदारसंघ वायनाडमधील जनतेशी संवाद साधणार आहेत. शिवाय, ते कल्पेटा इथं रोड शो करणार असून त्यानंतर ते मीडियाशी बोलणार आहेत. त्यांच्या जाहीर सभेला हजारो लोक येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

राहुल गांधींनी वायनाडमधूनच 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. दुसरीकडं अमेठीच्या जुन्या जागेवरून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राहुल गांधींनी वायनाडमध्ये 4.31 लाख मतांनी विजय मिळवला होता.वृत्तानुसार, राहुल गांधींसोबत एआयसीसीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, तारिक अन्वर, विरोधी पक्षनेते व्हीडी सतीसन, केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के सुधाकरन, मुस्लिम लीगचे प्रदेशाध्यक्ष पनाक्कड सादिक अली शिहाब आणि इतर अनेक ज्येष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.'सत्यमेव जयते रॅली'

राहुल गांधींच्या रोड शो'ची खास गोष्ट म्हणजे, त्यांच्या हातात पक्षाच्या झेंड्याऐवजी तिरंगा असणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांनीही असाच मोर्चा काढला होता. हातात तिरंगा घेऊन नेत्यांनी विजय चौक ते कॉन्स्टिट्यूशन क्लबपर्यंत पदयात्रा काढली. यामध्ये 19 संघटना सहभागी झाल्या होत्या.

राहुल गांधींच्या दौऱ्याचं महत्त्व काय?

राहुल गांधींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. कारण, आता त्यांचं सदस्यत्व रद्द झालं आहे. अशा स्थितीत राहुल गांधींना न्यायालयाकडून दिलासा मिळेल, अशी पूर्ण आशा या दौऱ्यातून स्पष्ट होत आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांसोबत सुरत गाठून आपल्या शिक्षेविरोधात दाद मागितली होती. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 मे रोजी होणार आहे. या प्रकरणी राहुल गांधींना जामीन मंजूर झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने