बटर चिकन, नान, अन्… चक्क एलॉन मस्क ही भारतीय पदार्थांच्या प्रेमात; म्हणाले….

अमेरीका : बटर चिकन, नान आणि राइस असंख्य भारतीयांचे आवडीचे पदार्थ आहेत. अनेक लहान मोठ्या ढाब्यांपासून ते महागड्या रेस्टॉरंटमध्ये हे पदार्थ आवर्जून मिळतात. बहुतेक भारतीयांना बटर चिकनसोबत नान आणि राइस खायला आवडतो. या पदार्थांनी आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांना भुरळ घातली आहे. अब्जाधीश एलॉन मस्क यांनाही भारतीयांप्रमाणे बटर चिकन, नान आणि राइस खूप आवडतो.

एलॉन मस्क यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या भारतीय खाद्यपदार्थांच्या फोटोंवर एक कमेंट केली आहे. जी आता खूप व्हायरल होत आहे.
एलॉन मस्क हे त्यांच्या लक्झरी लाइफसाठी ओळखले जातात. ट्विटरची मालकी हातात घेताच ते या प्लॅटफॉर्मवर अधिक सक्रिय असतात. दररोज एक ना एक ट्वीट शेअर करतात, जे नेहमी चर्चेचा विषय बनते. पुन्हा एकदा मस्क यांनी भारतीय पदार्थांसंदर्भातील ट्वीटवर कमेंट केली आहे, जी आता चर्चेचा विषय ठरत आहे.

ट्विटरवर डॅनियल नावाच्या एका युजरने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, त्याला भारतीय जेवण खूप आवडते. यानंतर एलॉन मस्क यांनी या ट्वीटवर कमेंट करत लिहिले की, खरेच. डॅनियलने पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये बटर चिकन, नान, राइस असे पदार्थ दिसत आहेत. या पोस्टवर अनेक भारतीय युजर्सनी मस्क यांना भारताला भेट देण्याचे आवाहन केले आहे. यावर अभिनेता रणवीर शौरीने म्हटले की, भारतीय पाककृती सर्वात वैविध्यपूर्ण आहे. यामुळे एलॉन मस्कदेखील उत्तर देण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. त्यांनीही या भारतीय पदार्थांना आवडीचे पदार्थ म्हटले आहे.

एलॉन मस्क यांनी बटर चिकन, नानबद्दल ट्वीट करताच अनेक ट्विटर युजर्सनी त्यावर रिप्लाय देण्यास सुरुवात केली आहे. या ट्वीटला काही वेळातच २० हजारांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. अनेक युजर्सनी बटर चिकनसोबत मस्क यांचा फोटोशॉप केलेला फोटो पोस्ट केला आहे. युजर्स इथेच थांबले नाहीत तर त्यांनी आता भारतीय पदार्थांची लिस्टच सांगायला सुरुवात केली आहे. एका युजरने मस्क यांना जम्मूचा राजमा चावल ट्राय करण्याचा सल्ला दिला आहे. तर काही युजर्सनी हैदराबादी बिर्याणी, इडली-डोसा खाण्याचाही सल्ला दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने