येत्या प्रजासत्ताकदिनी ‘नारी शक्ती’चे दर्शन, कर्तव्यपथावर केवळ महिला सैनिकांचेच संचलन होण्याची शक्यता

नवी दिल्ली : मागच्या काही काळापासून भारतीय सैन्य दलात महिलांचा सहभाग कसा वाढेल, महिलांना नव्या संधी कशा उपलब्ध होतील, यावर धोरणात्मक कार्य करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाने पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर केवळ महिला सैनिकांचा सहभाग असलेले पथसंचलन करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाकडून मार्च महिन्यात तीनही सैन्य दले, विविध मंत्रालये, सरकारी विभाग आणि संचलनात सहभागी होणाऱ्या संस्थांना एक अंतर्गत सूचना पाठवून पुढील वर्षी २६ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या संचलनात केवळ महिला सैनिकांचे पथक सामील करावे, अशी सूचना केली आहे. कर्तव्यपथावर होणाऱ्या विविध संचलने, बँड, देखावे यांमध्ये केवळ महिलांचा समावेश असावा, अशी ती सूचना आहे. तथापि, सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयामुळे महिलांना संचलनात सहभागी होण्याची अधिकाधिक संधी मिळेल. तसेच सशस्त्र दलांमध्ये महिलांचा अद्याप सहभाग झालेला नाही, तो वाढविण्यासाठीदेखील सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आजवर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महिलांचा सहभाग कसा वाढत गेला, याबाबत घेतलेला हा आढावा.


२०२३
२०२३ सालात, भारताने ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी कर्तव्यपथावरील संचलनाला नारीशक्ती अशी मुख्य कल्पना होती. विविध राज्यांनी आपल्या चित्ररथांमधून नारीशक्तीची झलक दाखविली. नौदलाने आपल्या देखाव्यातून डॉर्नियर विमान उडविणाऱ्या महिला वैमानिकांची झलक दाखविली. समुद्रावर पाळत ठेवण्यासाठी महिला वैमानिक कशा प्रकारची कामगिरी बजावत आहेत, हे याद्वारे दाखविले. केंद्रीय राखीव पोलीस दलातील सशस्त्र महिला पोलिसांच्या तुकडीनेही आपले सामर्थ्य कर्तव्यपथावर दाखवून दिले.
नौदल आणि हवाई दलाच्या तुकड्यांनी आपल्या संचलनात महिला अधिकाऱ्यांकडे नेतृत्व दिले होते. लेफ्टनंट कमांडर दिशा अम्रित आणि स्क्वाड्रन लीडर सिंधू रेड्डी यांनी अनुक्रमे दोन्ही दलांचे नेतृत्व केले. रेड्डी या एमआय – १७ हेलिकॉप्टरच्या पायलट आहेत तर अम्रित या नौदलाच्या डॉर्नियर २२८ या टेहळणी करणाऱ्या विमानाच्या पायलट आहेत. नौदलाने पहिल्यांदाच आपल्या संचलनात तीन महिला सैनिक आणि सहा अग्निवीरांचा समावेश केला होता.
हवाई दलाकडून एअर डिफेन्स अधिकारी लेफ्टनंट चेतना शर्मा यांनी सहभाग घेतला होता. तसेच मोटरसायकल रायडर्सच्या पथकातदेखील महिलांचा या वेळी समावेश करण्यात आला होता. सीमा सुरक्षा दलामध्ये उंटावरून टेहळणी करणाऱ्या पथकातदेखील या वेळी महिलांचा समावेश करण्यात आला होता.

२०२२
२०२२ च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात हवाई दलातर्फे सादर करण्यात आलेल्या चित्ररथात राफेल या लढाऊ विमानाच्या वैमानिक शिवांगी सिंह यांचा सहभाग पाहायला मिळाला होता. हवाई दलातर्फे सादर होणाऱ्या चित्ररथात सहभागी होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अधिकारी ठरल्या. तसेच ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या बातमीनुसार याच वर्षी सीमा सुरक्षा दलात डेअरडेव्हिल्स स्टंट करणाऱ्या पथकात, ज्यांना वडील किंवा पतीच्या निधनानंतर त्यांच्या जागी सैन्य दलात नोकरी प्राप्त झाली होती आशा, १४ महिलांचा समावेश होता.

२०२१
हवाई दलाच्या चित्ररथात लढाऊ विमानाच्या पायलट म्हणून फ्लाइट लेफ्टनंट भावना कांत यांचा समावेश पाहायला मिळाला. भावना या पहिल्या महिला वैमानिक होत्या. दोन वर्षांआधी हवाई दलाच्या युद्ध मोहिमेवर जाण्यासाठी भावना कांत यांनी आवश्यक अर्हता प्राप्‍त केली होती. त्या एकट्याने युद्ध मोहिमेवर जाणाऱ्या महिला पथकापैकी एक वैमानिक होत्या.

२०२०
तानिया शेरगिल यांनी २०२० सालच्या संचलनात पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व केले होते. अशा प्रकारे पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. २६ जानेवारी २०२० नंतर ८ मार्च रोजीच्या महिलादिनी सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेरगिल यांचे उदाहरण देऊन, महिला आताही कुठेही कमी नसल्याचे सांगितले. तसेच सैन्य दलात असा कोणताही विभाग असणार नाही, जिथे महिलांना संधी नाही, असेही ते म्हणाले.

२०१९
आसाम रायफल तुकडीतील सर्व महिलांनी या वर्षी संचलनात सहभाग घेतला होता. देशातील सर्वात जुने निमलष्करी दल असलेल्या या तुकडीचे नेतृत्व मेजर खुशबू कनवर यांनी केले. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना त्या म्हणाल्या, “आसाम रायफल्समधील सर्व महिला सैनिकांचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली, हा माझा सन्मान आणि अभिमान असल्याचे मी समजते. यासाठी आम्ही खूप मेहनत घेऊन सराव केला. राजस्थानमधील एका बसवाहकाची मी मुलगी आहे. जर मी यशस्वी होऊ शकते, तर देशातील कोणतीही मुलगी तिचे स्वप्न पूर्ण करू शकते.”
याच वर्षी कॉर्प्स ऑफ सिग्नल्स विभागातील कॅप्टन शिखा सुरभी यांनी डेअरडेव्हिल्स पथकातील पुरुष सहकाऱ्यांसमवेत मोटारसायकल स्टंट केले होते.

२०१८
सीमा सुरक्षा दलातील मोटारसायकल पथकातील सर्व महिलांनी या वर्षी संचलनात सहभाग घेतला होता. बीएसएफमधील २७ महिला सैनिकांनी ३५०सीसी रॉयल एनफिल्ड बुलेट या मोटारसायकलवरून स्टंट आणि कवायती करून दाखविल्या. नव्याने स्थापन केलेल्या ‘सीमा भवानी’ या बीएसएफच्या पथकात त्या वेळी ११३ महिला सदस्या होत्या. संचलनाचे नेतृत्व उपनिरीक्षक स्टँझिन नोरयांग यांनी केले होते.

२०१६
केंद्रीय राखीव सुरक्षा दलातील महिलांनी पहिल्यांदाच संचलनात सहभाग घेतला होता. वूमन डेअरडेव्हिल्स सीआरपीएफ या तुकडीमध्ये १२० सैनिकांचा सहभाग होता.

२०१५
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच २०१५ साली देशाच्या लष्कर, नौदल, हवाई दल या तीनही दलांतील महिलांनी इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन असे संचलन केले होते. लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन दिव्या अजित, नौदलाचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर संध्या चौहान आणि हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर स्नेहा शेखावत यांनी केले होते. तीनही तुकड्यांमध्ये एकूण १४८ महिला सैनिकांचा समावेश होता. या वेळी कॅप्टन अजित म्हणाल्या की, महिला दुय्यम नसून त्या समान आहेत. आम्ही याआधी सैन्य दिनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच संचलन केले आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महिला म्हणून आमची तुकडी पहिल्यांदाच संचलन करत आहे. त्यामुळे आता आम्हीदेखील प्रत्यक्ष युद्ध दलात लवकरच सामील होऊ, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने