जेट प्रोपोल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) येथे ‘नासा’चे एक पथक या नव्या योजनेवर काम करीत आहे. ‘द एक्झोबायलॉडी एक्सटंट लाइफ सर्वेअर किंवा ‘ईल्स’ (ईईएलएस) या रोबोची रचना सापासारखी करण्यात आली आहे.
एन्सेलेडसवरील बर्फमय भागातील वैशिष्ट्य जाणून घेणे हे या रोबोचे उद्दिष्ट आहे. आपल्या पृथ्वीवरील दुर्गम स्थाने, चंद्र आणि सौरमालेतील अन्य ग्रहांच्या नकाशे, मार्ग स्वयंचलितपणे बनविणे आणि त्यांचा शोध घेण्याच्या दृष्टिने ‘ईल्स’ची निर्मिती केली आहे, असे ‘जेपीएल’ने सांगितले.
या लॅबोरेटरीने २०१९मध्ये प्रथम याचे प्रारूप विकसित करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून ते त्यात सातत्याने सुधारणा करीत आहेत. २०२२ मध्ये ‘ईल्स’च्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करीत दर महिन्याला त्याच्या चाचण्या करण्यासही ‘जेपीएल’ने सुरुवात केली.
सध्या ‘ईल्स १.०’ ही नवी आवृत्ती तयार केलेली असून त्याचे वजन १०० किलो असून लांबी चार मीटर आहे. वळणे, पकडणे, पुढे जाणे अशा हालचाली करण्यासाठी स्क्रूचा वापर करून दहा समान खंडात हा रोबो तयार केला आहे.
वालुकामय, बर्फाळ आणि बर्फाळ परिस्थितीत रोबोची चाचणी घेण्यात आली आहे. यात ‘जोपीएल’च्या ‘मार्स यार्ड’चाही वापर केला जात आहे. स्किईंग केल्या जाणाऱ्या भागात मंगळासारखा भूप्रदेश (मार्स यार्ड) तयार केलेला असून त्याला ‘रोबो मैदान’ असे म्हटले आहे.
पृथ्वी व सुदूर अवकाशातील ग्रह आणि तारे यांच्यातील संदेशवहनाचा कालावधी हा दीर्घ असल्याने रोबोचे स्वयंचलित कार्य हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. उदा. शनिपर्यंत रेडिओ लहरींद्वारे एका दिशेने संदेश पोहचण्यासाठी ८३ मिनिटे लागतात. पृथ्वी व अन्य ग्रह-तारांमधील संदेशवहनाला लागणाऱ्या वेळेमुळे ‘ईल्स’सा वातावरणाचा स्वयंचलित पद्धतीने माग काढीत आणि वैज्ञानिक साधनांसह माहिती गोळा करण्याची जोखीम घेत प्रवास करावा लागणार आहे. ‘ईल्स’मध्ये कोणती वैज्ञानिक साधने ठेवण्यात येणार आहेत, हे निश्चित झालेले नाही.
स्टिरीओ कॅमेरे व ‘लिडर’चा वापर
या प्रकल्पाचे प्रमुख रोहन ठक्कर पत्रकार परिषदेत म्हणाले, की जेथे रस्ते नाहीत, वाहतूक नियंत्रण यंत्रणा नाही, कोणतेही थांबे नाहीत, अशा परिस्थितीत एक स्वयंचलित मोटार जात आहे, अशी कल्पना करा. अशा वेळी रोबोला मार्ग निश्चित करून त्यानुसार मार्गक्रमण करावे लागणार आहे.
अशा स्थितीत परिसराचे त्रिमितीय नकाशे ‘ईल्स’ तयार करेल. यासाठी आठ स्टिरीओ कॅमेरे आणि लेझर प्रकाशाचा वापर करून भूप्रदेशाचे नकाशे बनविण्याच्या तंत्रज्ञानाचा (लिडर- लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग) वापर हा रोबो करेल. रोबोसाठी सर्वांत सुरक्षित मार्ग शोधण्यासाठी सेन्सरमधील दिशादर्शक माहितीचा उपयोग होईल. वेगवेगळ्या भूप्रदेशांमधील वातावरणात रोबो वापरण्यासाठी अभियंते संचाराचे पर्याय शोधत आहेत.