अयोध्येत रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कधी होणार? हिंदू सणाच्या पवित्र दिनी मुहूर्त? पंतप्रधानांनाही पाठवले निमंत्रण

अयोध्येतील राम मंदिर दर्शनासाठी केव्हा खुले होणार, याकडे अवघ्या राम भक्तांचं लक्ष लागून राहिलं आहे. राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरू असून येथे जाऊन दर्शन घेण्यास रामभक्त आतुर आहेत. दरम्यान, २०२४ पर्यंत राम मंदिर दर्शनसाठी खुलं होणार असल्याचं याआधीही सांगण्यात आलं होतं. आता त्याही पुढे जाऊन एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

राम मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्तीची प्रतिष्ठापना कधी होणार, याबाबतची माहिती समोर आली आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार १४ किंवा १५ जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिनानिमित्त गाभाऱ्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.




२०२० मध्ये सुरू झालेल्या मंदिराच्या बांधकामावर ट्रस्ट देखरेख करत आहे. ट्रस्टच्या सदस्यांनी सांगितले की मूर्तीची स्थापना डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता नाही. “डिसेंबरमध्ये मूर्ती स्थापनेसाठी कोणताही शुभ दिवस नाही. हिंदू कॅलेंडरनुसार, जेव्हा सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात जातो तेव्हाच मकर संक्रांतीपासून प्राणप्रतिष्ठेचे विधी होऊ शकतो. १४ किंवा १५ जानेवारीला होणारी मकर संक्रांती हा रामलल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेचा सर्वात शुभ दिवस आहे”, ट्रस्टच्या एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी जानेवारी महिन्यात सांगितले होते की, “२०२४ मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (अभिषेक) सोहळा होऊ शकतो.”

पंतप्रधानांनाही पाठवले पत्र

राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधानांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या निमंत्रणात तीन तारखा सुचवण्यात आल्या आहेत. ज्योतिषांशी सल्लामसलत केल्यानंतर निवडलेल्या तीन शुभ तारखा १७ ते २४ जानेवारी दरम्यान असू शकतात, अशी माहिती ट्रेस्टने गेल्या आठवड्यात दिली होती. परंतु, नेमकी तारीख उघड करण्यात आली नाही.

५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका भव्य समारंभात मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला होता. त्यानंतर बांधकाम सुरू झाले. नुकतेच राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील टीमने आणि लार्सन अँड टुब्रो, टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स आणि ट्रस्टच्या अभियांत्रिकी संघातील सदस्यांचा समावेश करून त्याचे कामाच माहिती घेतली. अयोध्येतील तीन मजली राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम महिनाअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने