मान्सून आला, पण पावसाचा जोर वाढणार कधी? मुंबई आणि परिसरात पुढील ३ दिवस असं असेल वातावरण

मुंबई : चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकल्यानंतर मुंबईच्या कमाल तापमानात घट झाली आहे. तरीही आर्द्रतेमुळे दिवसभर उकाड्याची जाणीव कायम होती. संध्याकाळी मुंबईत ठिकठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आणि वातावरणात बदल झाला. संध्याकाळच्या या हलक्या सरींमुळे मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला. मुंबईत सांताक्रूझ येथे मंगळवारी ३५.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. सोमवारी ते ३६.८ अंश सेल्सिअस होते. कुलाबा येथे सोमवारी आणि मंगळवारी दोन्ही दिवस ३३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे सोमवारपेक्षा मंगळवारचे कमाल तापमान खाली उतरले, मात्र वातावरण दिवसभर आर्द्रता असल्याने उकाड्याचे प्रमाण हे सोमवारहूनही अधिक जाणवल्याची तक्रार मुंबईकरांनी केली.
कुलाबा येथे मंगळवारी सकाळी सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के होती, तर संध्याकाळी ७९ टक्के होती. सांताक्रूझ येथे सकाळी ६९ टक्के, तर संध्याकाळी ७२ टक्के आर्द्रता होती. या वाढत्या आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक तापमान जाणवले. सकाळीही ऊन-पावसाचा खेळ सुरू होता, मात्र सकाळी काही ठिकाणी पाऊस पडला. दिवसभर ढगाळ वातावरणही जाणवत होते. त्यामुळेही अधिक अस्वस्थता जाणवली. सांताक्रूझ येथे सायं. ५.३० पर्यंत ०.६ मिलिमीटर, तर कुलाबा येथे २ मिलिमीटर पाऊस पडला. पावसाच्या अशा शिडकाव्यामुळे मुंबईमध्ये मान्सून दाखल खरोखरच दाखल झाला का, असा प्रश्न मुंबईकरांनी उपस्थित केला.

दुपारनंतर मात्र हा पावसाचा शिडकावा थोडा जास्त वेळ झाला. पावसाच्या उपस्थितीमुळे वातावरणातही थोडासा गारवा पसरला. मंगळवारी सायं. ७ पर्यंतच्या १२ तासांमध्ये स्वयंचलित केंद्रांवर झालेल्या नोंदीनुसार, दिंडोशी अग्निशमन दल केंद्रावर मुंबईत सर्वाधिक म्हणजे सुमारे ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर मुंबईत बहुतांश केंद्रांवर दिवसभरात ५ मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली.

मुंबईसह परिसरात कसं असेल वातावरण?

येत्या शनिवारपर्यंत मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांसह दक्षिण कोकणातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागानं म्हटलं आहे. त्यामुळे कोकणात मान्सून दाखल झाल्यानंतरही कोकण विभागात सरींची तीव्रता वाढली नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तरी वाढणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने