मदर डेअरीने ग्राहकांना दिला दिलासा, धारा ब्रँडच्या तेलाच्या दरात कपात, नवीन दर काय?

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मदर डेअरीने लोकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता पावसात भज्जी खाणे आणि चहा पिण्याचा तुमच्या खिशावरचा भार काही प्रमाणात कमी होणार आहे. खाद्यतेल ब्रँड ‘धारा’ विकणाऱ्या मदर डेअरीने तेलाच्या दरात प्रतिलिटर १० रुपयांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. नवीन किमतीसह पॅकिंग पुढील आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे. मदर डेअरी ही दिल्ली आणि एनसीआर प्रदेशातील दुग्धजन्य पदार्थांचा एक प्रमुख पुरवठादार असून, धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल देखील विकते.कंपनीला काय म्हणायचे आहे?

जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्यामुळे धारा ब्रँडच्या तेलाच्या किमतीत ही कपात करण्यात आली आहे, असंही मदर डेअरीचे म्हणणे आहे. “धारा खाद्यतेलाच्या सर्व प्रकारांमध्ये कमाल किरकोळ किमतीत (MRP) प्रति लिटर १० रुपयांपर्यंत कपात केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि देशांतर्गत मोहरीसारख्या तेलबिया पिकांच्या उपलब्धतेत झालेली सुधारणा लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे,” असंही मदर डेअरीच्या प्रवक्त्याने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच पुढील आठवड्यात धारा ब्रँडचे खाद्यतेल नवीन एमआरपीसह येईल, असे प्रवक्त्याने सांगितले. दरात कपात केल्यानंतर धाराचे रिफाइंड तेल आता २०० रुपये प्रति लिटरवर आले आहे. त्याचप्रमाणे धारा काची घणी मोहरीच्या तेलाची एमआरपी १६० रुपये प्रति लिटर आणि धारा मोहरीच्या तेलाची एमआरपी १५८ रुपये प्रति लिटर असेल. यासह धाराचे रिफाइंड केशर तेल आता १५० रुपये प्रति लिटर आणि खोबरेल तेल २३० रुपये प्रति लिटर दराने विकले जाईल.

केंद्र सरकारकडून दर कमी करण्याच्या सूचना

केंद्राने शुक्रवारी खाद्यतेल संघटनेला खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याचे निर्देश दिले. जागतिक बाजारपेठेतील घटत्या किमती पाहता केंद्राने खाद्यतेलाचे दर प्रतिलिटर ८ ते १२ रुपयांनी तातडीने कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अन्न मंत्रालयाने अन्न सचिव संजीव चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग प्रतिनिधींसोबत घेतलेल्या बैठकीनंतर या संदर्भात निर्देश जारी केले होते. इतकेच काय, त्यांना त्यांच्या किमती कमी करण्याचा सल्लाही देण्यात आला होता. निर्मात्याने आणि रिफायनरने वितरकाला देऊ केलेल्या किमतीही तत्काळ प्रभावाने कमी करणे आवश्यक आहे, जेणेकरून किमतीतील घसरण कोणत्याही प्रकारे कमी होणार नाही. खाद्यतेलाच्या किमतीतील घसरणीचा कल कायम आहे आणि खाद्यतेल उद्योगाकडून आणखी कपातीची तयारी केली जात आहे, असंही मंत्रालयाने म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने