होम डेकोर म्हटलं की, फक्त रंग, फर्निचर आणि पडदे या सगळ्याचा विचार केला जातो. पण यामध्ये तुम्ही छोट्या रोपट्यांचा देखील तितकाच विचार करू शकतो. हिरवळ तशी आता घराशेजारी पाहायला मिळत नाही. अशावेळी झाडप्रेमी आपल्या घरातच झोटी झोटी रोपटी लावतात. झाडांची ही छोटी रोपटी फक्त बाल्कनीपर्यंत मर्यादित न राहता आता अगदी किचनपासून ते बेडरूमपर्यंत पसरल्याच आपल्याला पाहायला मिळतं. यामुळे घराला एक जीवंतपणा येतो.
होम डेकोरमध्ये झाडांचा खूप मोठा वाटा आहे. अगदी तुम्ही घरच्या घरी ही छोटी रोपटी लावू शकता आणि घराला अतिशय फ्रेश आणि ताजा लुक देऊ शकता. पण जर तुम्ही झाडं निवडताना वास्तू टिप्सचा विचार केलात तर नक्कीच या झाडांमुळे तुमच्या घराला एक पॉझिटिव्ह वाईब्स तर देतीलच पण यासोबतच सुख, समाधान आणि ऐश्वर्य देखील तुमच्या घरात नांदेल.
गोल्डन पोथोस (Golden Pothos)
गोल्डन पोथोस म्हणजे सामान्य भाषेत याला मनी प्लांट म्हणतात. हे रोपटं अतिशय चमकदार, हृदयाच्या आकाराची पाने असलेला आणि वेल प्रकारात मोडणारा आहे. महत्वाचं म्हणजे मनी प्लांटचं एक रोपटं घरात असेल तर तुम्ही त्यापासून असंख्य छोटी छोटी रोपटी तयार करू शकतात.
याला ज्याप्रमाणे मनी प्लांटने संबोधतात तसंच त्याच महत्व आहे. घराची उत्तम भरभराट होण्यासाठी तुम्हाला गोल्डन पोथोस म्हणजे मनी प्लांट मदत करते. फक्त तुम्हाला हे घराच्या दक्षिण-पूर्व (South East) भागात ठेवायचं आहे.
पिस लिली (Peace Lily)
होम डेकोरमध्ये सर्वात लोकप्रिय इनडोअर प्लांट आहे पिस लिली. हे लिली प्रकारातले अरूम कुटुंबातील उष्णकटिबंधीय सदाहरित वनस्पती आहे. वास्तू टिप्सनुसार या रोपट्यामुळे घरात आनंद आणि उत्साह कायम राहतो. महत्वाचं म्हणजे हे रोपटं बेडरूममध्ये ठेवावं.
स्नेक प्लांट (Snake Plant)
अनेकदा होम डेकोरमध्ये स्नेक प्लांटचा वापर केला जातो. कारण हे दिसायला अतिशय लोभस आणि नाजूक रोपटं आहे. यामुळे घरातील नकारात्मक वाईब्स निघून जातात. तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. या रोपट्यामुळे आतील हवा खेळती राहण्यास मदत होते. वास्तुनुसार हे घराच्या पूर्वेकडील कोपऱ्यात ठेवावे. यामुळे याचा अधिक फायदा घराला आणि घरातील व्यक्तींना होतो.
रब्बर फिग प्लांट (Rubber Fig Plant)
रबराचे रोप घरामध्ये लावल्यास ते शुभ मानले जाते. घरासाठी रबर रोपामुळे वास्तुनुसार आर्थिक समृद्धी, संपत्ती आणि व्यावसायिक यश मिळवून देतात असे मानले जाते. रबर प्लांट नैऋत्य दिशेला म्हणजे दक्षिण पश्चिमेला ठेवल्यास त्याचा फायदा होतो.
जेड प्लांट (Jade Plant)
जेड वनस्पती नशीब आणि समृद्धी आणण्यासाठी ओळखली जाते आणि वाढीचे प्रतीक आहे. त्यामुळे मैत्री वाढेल असेही मानले जाते. वास्तुनुसार जडे वनस्पती आग्नेय दिशेला ठेवावी तसेच अगदी मुख्य दरवाजाजवळही हे रोप ठेवल्यास फायदा होतो. महत्वाचं म्हणजे जेडला हलका प्रकाशही पुरेसा असतो. तसेच हे रोप होम डेकोरमध्ये अतिशय सुबक दिसतं. या झाडांमुळे तुमच्या घराला चांगला लुक येईलच पण यासोबतच वास्तुनुसार घराचं घरपणही या रोपांमार्फत जपलं जाणार आहे.