ऑफिसमधून जाताना भिजल्यामुळे लॅपटॉप झालाय ओला? त्वरीत करा 'हे' काम

मान्सूनच्या आगमनाने सध्या सगळेच सुखावले आहेत. मात्र, ज्यांना बाईकवर ऑफिसला जायला लागतं, त्यांच्या अडचणीत यामुळे वाढ झाली आहे. ऑफिस सुटल्यानंतर घरी जात असताना नेमकं अर्ध्या रस्त्यात पाऊस सुरू होऊन कित्येक जण भिजले असतील. अशा वेळी स्वतःपेक्षा बॅगेतील लॅपटॉपची चिंता आपल्याला अधिक असते.

कित्येक वेळा आपली बॅग वॉटर रेझिस्टंट असूनही आतमध्ये पाणी जातंच. अशा वेळी बॅगेतील इतर सामान तर भिजतंच, मात्र आपल्या गरजेचा असलेला लॅपटॉपही ओला होतो. त्यातही जर लॅपटॉप कंपनीने दिलेला असेल, तर आपल्याला अजूनच टेन्शन येतं. मात्र, अशा वेळी पॅनिक न होता काही गोष्टी करणं गरजेचं आहे.
लॅपटॉप करा बंद

तुमचा लॅपटॉप जर स्लीप मोडवर किंवा सुरू असेल, तर तातडीने तो बंद करा. सोबतच, लॅपटॉपला जर यूएसबी किंवा अन्य काही अ‍ॅक्सेसरी लावलेल्या असतील तर त्या काढून टाका. अशा वेळी चुकूनही लॅपटॉप चार्जिंगला लाऊ नका. 

लॅपटॉप बंद केल्यानंतर तो उघडून उलटा करून ठेवा. एखाद्या तंबूप्रमाणे याचा आकार असायला हवा. लॅपटॉप उलटा केल्यामुळे त्यातील पाणी वायरिंगपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे तो सुरक्षित राहतो.

यानंतर लॅपटॉपची बॅटरी काढून घ्या. तुमच्या लॅपटॉपची बॅटरी जर काढता येत नसेल, तर ही स्टेप स्किप करा. त्यानंतर, एखाद्या सुती आणि मऊ कापडाने लॅपटॉप पुसून घ्या. त्यानंतर पुन्हा हा लॅपटॉप उलटा करून एखाद्या टॉवेलवर ठेऊन द्या. सुमारे चार तास हा लॅपटॉप असाच ठेवा.

हेअर ड्रायर

लॅपटॉप ड्राय करण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायरचा वापरही करू शकता. मात्र, त्यासाठी ड्रायरची सेटिंग लो-हीट वर ठेवा. तसंच हेअर ड्रायर लॅपटॉपपासून थोडा दूर ठेवा. शिवाय, लॅपटॉपच्या स्क्रीनवर थेट हेअर ड्रायरची हवा जाणार नाही याची खबरदारी घ्या.

सिलिका जेल

पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही घरात सिलिका जेल आणूण ठेवणं फायद्याचं ठरेल. लॅपटॉप किंवा फोन पाण्यात भिजल्यास त्यातील आद्रता शोषून घेण्याचं काम हे जेल करते. तुम्ही हे तुमच्या बॅगेत देखील नेऊ शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने