आषाढी वारी म्हटलं की हातात टाळ घेऊन हरिनामाच्या जल्लोषात मग्न झालेले वारकरी पटकन डोळ्यासमोर येतात. दरवर्षी देहू येथून तुकोबांची आणि आळंदीहून ज्ञानोबांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जाते. त्याबरोबर ”माऊली माऊली”, ”ज्ञानोबा माऊली तुकाराम”, ”विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ असा हरिनामाचा गजर करीत लाखो वारकरीदेखील आळंदीहून पंढरपूरला पायी जातात. आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा उत्सव असून या काळात सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. दरम्यान संताच्या पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थानाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानाकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, तुकोबांची पालखी १० जून २०२३ रोजी देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आळंदी येथून जेष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच ११ जून २०२३ रोजी ज्ञानोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे.
असा असेल तुकोबांच्या पालखीचा प्रवास
आळंदी येथून ज्ञानोबांची पालखी प्रस्थान करण्यापूर्वी श्री क्षेत्र देहू येथून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करेल. १० जून २०२३ म्हणजे माउलींच्या पालखीच्या प्रस्थानाच्या फक्त एक दिवस आधी तुकोबांची पालखी देहूमधील ईनामदार साहेब वाडा येथून प्रस्थान करेल. त्यानंतर आकुर्डी, नानापेठ पुणे, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उडंबडी गवळ्याची, बारामती, सणसर, आंथुर्णे, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोलीमार्गे प्रवास करत तुकांबाची पालखी वाखरीला पोहोचेल. ही पालखी पंढरपूरात संत तुकाराम महाराज मंदिर (नवी इमारत) येथे २८ जून २०२३ रोजी मुक्कामी असेल आणि या पालखीची २९ जून २०२३ रोजी नगर प्रदक्षिणा पार पडेल.
असे असेल ज्ञानोबा माऊलींचा पालखी सोहळा
महाराष्ट्रातून आलेल्या लाखो वारकऱ्यांसह संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून ११ जूनला रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास प्रस्थान करेल. त्यानंतर भवानीपेठ, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, विमानतळ फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी आणि पंढरपूर या मार्गाने माऊलींची पालखीचा प्रवास पार पडेल.
२८ जून रोजी तब्बल १७ दिवसांच्या पायीवारी पूर्ण केल्यानंतर ही पालखी पंढरपूरात प्रवेश करेल. त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच २९ जून २०२३ रोजी चंद्रभागा स्नान आणि पालखीची नगर प्रदक्षिणा पार पडेल. ३ जुलैपर्यंत पालखी पंढरपूरातच मुक्कामी असेल आणि विठ्ठल- रुक्मिणीभेटीनंतर त्याच दिवशी पालखीचा परतीचा प्रवास वाखरी येथून सुरू होईल.
तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखी रिंगण सोहळा केव्हा असेल?
संत तुकोबा महाराज पालखी रिंगणाच्या तारखा
२० जून २०२३ रोजी बेलवडी येथे गोल रिंगण सोहळा पार पडेल.
२२ जून २०२३ रोजी इंदापूर येथे गोल रिंगण सोहळा पार पडेल.
२४ जून २०२३ रोजी अकलूज माने विद्यालय येथे गोल रिंगण सोहळा पार पडेल.
२५ जून २०२३ रोजी माळीनगर येथे उभं रिंगण सोहळा पार पडेल.
२७ जून २०२३ रोजी बाजीराव विहिर येथे उभं रिंगण सोहळा पार पडेल.
२८ जून २०२३ रोजी वाखरी येथे उभं रिंगण सोहळा पार पडेल.
संत ज्ञानोबांच्या पालखीच्या रिंगणच्या तारखा
२० जून २०२३ रोजी चांदोबाचा लिंब येथे उभं रिंगण सोहळा पार पडेल.
२४ जून २०२३ रोजी पुरंवडे येथे गोल रिंगण सोहळा पार पडेल.
२५ जून २०२३ रोजी खुडूस फाटा येथे गोल रिंगण सोहळा पार पडेल.
२६ जून २०२३ रोजी ठाकूरबुवाची समाधी येथे गोल रिंगण सोहळा पार पडेल.
२७ जून २०२३ रोजी बाजीरावची विहीर येथे गोल आणि उभं रिंगण सोहळा पार पडेल.
२८ जून २०२३ रोजी वाखरी येथे उभं रिंगण सोहळा पार पडेल.
माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी जेजुरी येथे १६ जूनला आणि नीरास्नानसाठी १८ जूनला भाविकांना वारीमध्ये सहभागी होण्याची संधी आहे. तुकोबांचे दर्शन घेण्यासाठी काटेवाडी येथील मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्यात भाविक सहभागी होऊ शकतात.