दिल्लीत पुरामुळे हाहाकार; यमुनेच्या पाण्याची पातळी २०८ मीटरवर, २० हजार लोकांचे स्थलांतर

गेल्या ४५ वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद यंदा दिल्लीत झाली असून यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पाण्याने राजघाट, लाल किल्ला व इंडिया गेटपर्यंत पाणीचपाणी झाले आहे.

या मुसळधार पावसामुळे यमुना मेट्रो स्टेशन पाण्याखाली गेले असून सावधानतेचा इशारा म्हणून दिल्ली सरकारने येत्या रविवारपर्यंत शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत पावसाने कहर केला असून यंदा गेल्या ४५ वर्षांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

बुधवारपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी यमुना नदीत शेजारच्या राज्यातील धरणांचे पाणी सोडण्यात येत असल्याने यमुना नदीच्या काठावर वसलेल्या २० हाजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. हरियानातील हथनीकुंड धरणातील पाणी कमी गतीने सोडावे, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

यमुना नदीची पाण्याची पातळी २०८ मीटर एवढी झाली आहे. गेल्या ४५ वर्षांत यमुनेने एवढी पाण्याची पातळी पहिल्यांदाच पार केली आहे. यामुळे यमुना नदीच्या काठावर असलेले यमुना बँक मेट्रो स्टेशन पाण्याखाली गेले आहे.

व्यावसायिक वाहतुकीवर निर्बंध

पावसाचा जोर कमी झाला तरी हवामाना खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केल्याने तसेच, अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले असल्याने शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे दिल्लीत व्यावसायिक वाहतुकीची वाहने आणण्यास दिल्ली सरकारने निर्बंध घातले आहे. पावसामुळे दिल्लीहून जाणाऱ्या ४०० रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे.

‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा

दिल्ली सरकारने अत्यावश्यक विभाग वगळता अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. अनेक रस्त्यांवर पाणी असून तसेच काही भागात अद्यापही मेट्रो व बस वाहतूक सेवा सुरळीत झालेली नसल्याने दिल्ली सरकारने ही सुविधा दिली आहे. दिल्लीतील तीन जल शुद्धीकरण केंद्रेही पाण्याखाली असल्याने ती बंद करावे लागले आहे. त्यामुळे दिल्लीतील पाणी पुरवठासुद्धा मर्यादित होणार आहे.

पर्यटकांना फटका

दिल्लीतील सर्व पर्यटन स्थळांमध्ये पाणीचपाणी झाले आहे. महात्मा गांधी यांची समाधी असलेले राजघाट, प्रसिद्ध लाल किल्ला व इंडिया गेट परिसरात पाणीच पाणी झाल्याने पर्यटकांना तेथे पोहोचणे शक्य नाही. त्याचप्रमाणे केंद्रीय कार्यालये असलेली आयटीओ परिसरातील रस्त्यांवर पाणी आले आहे. तसेच प्रगती मैदान परिसरातून जाणारा अंडरपास रस्ताही बंद ठेवला आहे.

यावर्षी पहिल्यांदा ल्युटियन्स झोनमधील रस्तेसुद्धा पाण्याखाली गेल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले होते. दिल्ली वाहतूक विभागाने आयपी उड्डाणपूल ते चांदगी राम आखाडा दरम्यान असलेला महात्मा गांधी मार्ग, कालीघाट मार्ग व दिल्ली सचिवालय, वजिराबाद व चांडगी राम आखाडा दरम्यान असलेल्या रस्त्यांचा उपयोग वाहतुकीसाठी करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने