जम्मू काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यातल्या डोंगराळ भागामध्ये पाकिस्तानी सेनेचे शेकडो जवान घुसले. पाकिस्तानने भारताच्या विरोधात सैन्य अभियान राबवलं होतं. ही योजना आखली होती पाकिस्तानी सेनेचे तत्कालीन प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ आणि तीन जनरल म्हणजे मोहम्मद अजिज, जावेद हसन आणि महमूद अहमद.
कारगिलमध्ये ३ मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती, कारण याच दिवशी आतंकवाद्यांनी घुसखोरी करायला सुरुवात केली होती. हे युद्ध २६ जुलै रोजी संपलं. अशा प्रकारे एकूण ८५ दिवस दोन्ही देश आमने- सामने होते. आजच्या दिवसानिमित्त जाणून घ्या कारगिल युद्ध आणि त्याचा घटनाक्रम याविषयी...
३ मे १९९९ : कारगिलच्या डोंगराळ भागामध्ये स्थानिक गुराख्यांनी काही शस्त्रधारी सैनिक आणि आतंकवाद्यांना पाहिलं, त्यांनी सैन्याच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली.
५ मे १९९९ : कारगिल भागातल्या या घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैनिकांना तिथे पाठवण्यात आलं. या दरम्यान पाकिस्तानी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत पाच भारतीय सैनिक शहीद झाले.
९ मे १९९९ : पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलमध्ये आपले पाय चांगलेच रोवले होते. त्यामुळे त्यांनी भारतीय सेनेच्या दारुगोळ्यावर हल्ला करत मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला.
१० मे १९९९ : या पुढे पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेजवळच्या द्रास आणि काकसर भागासह जम्मू काश्मिरच्या अन्य भागांमध्ये घुसखोरी केला.
१० मे १९९९ : या दिवशी दुपारी भारतीय सेनेने ऑपरेशन विजय सुरू केलं. घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी काश्मीरमधून मोठ्या प्रमाणावर सैनिकांना कारगिल जिल्ह्यात नेलं. पण त्याचवेळी पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला केला नाही, असं उत्तर दिलं.
२६ मे १९९९ : भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी हवाई हल्ले कऱण्यास सुरुवात केली. या हवाई हल्ल्यांमध्ये अनेक पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा करण्यात आला.
१ जून १९९९ : पाकिस्तानी सेनेने हल्ले आणखी तीव्र केले आणि राष्ट्रीय महामार्ग १ ला लक्ष्य केलं. दुसरीकडे, फ्रान्स आणि अमेरिकेने भारताविरोधात युद्ध पुकारल्याबद्दल पाकिस्तानला जबाबदार धरलं.
५ जून १९९९ : हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सेनेचाच हात असल्याचा खुलासा करणारी कागदपत्रे सादर केली.
९ जून १९९९ : भारतीय सेनेच्या जवानांनी आपलं शौर्य दाखवत जम्मू काश्मीरच्या बटालिक सेक्टरमध्ये दोन प्रमुख स्थानांवर पुन्हा आपली पकड मजबूत केली.
१३ जून १९९९ : भारतीय सेनेने टोलोलिंग शिखरावर पुन्हा ताबा मिळवला त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला.
याच काळात भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी कारगिलचा दौरा केला.
२० जून १९९९ : भारतीय सेनेने टायगर हिल परिसरातल्या महत्त्वाच्या ठिकाणांवर ताबा मिळवला.
४ जुलै १९९९ : टायगर हिल भारतीय सैन्याच्या ताब्यात आली.
५ जुलै १९९९ : पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय दबावामुळे कारगिलमधून पाकिस्तानी सैन्याला परतण्याचे आदेश दिले.
१२ जुलै १९९९ : पाकिस्तानी सैन्याला मागे हटायला भाग पाडण्यात आलं.
१४ जुलै १९९९ : भारतीय पंतप्रधानांनी सेनेचं ऑपरेशन विजय यशस्वीपणे पूर्ण झाल्याची घोषणा केली.
२६ जुलै १९९९ : पाकिस्तानी सेनेने ताब्यात घेतलेल्या सर्व ठिकाणांवर पुन्हा ताबा मिळवत भारत या युद्धामध्ये विजयी झाला. कारगिल युद्ध दोन महिन्यांहूनही अधिक काळ चाललं आणि या दिवशी अखेर संपलं.
भारताच्या संरक्षणासाठी ५०० पेक्षा अधिक भारतीय सैनिकांनी आपले प्राण गमावले आणि युद्धादरम्यान ३००० हून अधिक पाकिस्तानी सैनिक आणि आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं.