पुरात घर-दुकानाचं नुकसान झालेल्यांना मिळणार ‘इतकी’ रक्कम, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नुकसानीसाठी प्रती कुटुंब १० हजार रुपये वाढीव मदतीची घोषणा केली. तसेच दुकानदार, टपरी धारकांनाही ५० हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्याचं त्यांनी नमूद केलं. ते शुक्रवारी (२८ जुलै) पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत बोलत होते.

ही वाढीव मदत जून ते ऑक्टोबर २०२३ या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येणार आहे. विधानसभेत केलेल्या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी वाढीव मदतीबाबत माहिती दिली.
प्रति कुटुंब १० हजार रुपये मदत

सध्या घर पाण्यात बुडालेले असल्यास, घरे पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा पूर्णपणे पडले असल्यास कपड्यांच्या नुकसानीसाठी प्रति कुटुंब २५०० रुपये आणि घरगुती भांडी/वस्तु यांच्या नुकसानीसाठी प्रति कुटुंब २५०० रुपये असे ५ हजार रुपये देण्यात येतात. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अट शिथिल करून ही रक्कम आता दुप्पट करण्यात येत आहे. कपड्यांचे नुकसान आणि घरगुती भांड्यांच्या नुकसानीसाठी आता १० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.

दुकानदारांना ५० हजार रुपयांपर्यंत मदत

एकनाथ शिंदे म्हणाले, “नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीत दुकानदारांना राज्य आपत्ती निधीत कुठलीही मदत होत नाही. त्यांना कुठलाही दिलासा मिळत नाही, ही बाब लक्षात घेऊन आम्ही त्यांनाही आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दुकान पाण्यात बुडालेले असल्यास, दुकान पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा दुकानांचे संपूर्ण नुकसान झाले असल्यास अशा दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल.”

“जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे आणि जे रेशनकार्ड धारक आहेत अशा दुकानदारांपैकी अधिकृत दुकानदारांना ही मदत मिळेल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

टपरीधारकांना १० हजार रुपयांपर्यंत मदत

दुकानदारच नाही, तर टपरीधारकांसाठीही आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. एकनाथ शिंदे म्हणाले, “छोट्या छोट्या टपऱ्यांमधून व्यवसाय करणारे आणि कुटुंब चालवणारे अनेक जण आहेत. अशा नुकसानग्रस्त टपरीधारकांना राज्य आपत्ती निधीत कुठलीही मदत होत नाही. आता अशा टपरीधारकांनाही पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल.”

जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत अशा अधिकृत नोंदणीकृत व परवानाधारक टपरीधारकांना ही मदत देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने