कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा 'या' तारखेपासून दररोज सुरू होणार; महाडिकांनी दिली महत्वाची अपडेट

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा १ ऑक्टोबरपासून दररोज सुरू होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. महाडिक यांनीच यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला हे यश आले आहे.

‘स्टार एअर’ या नामांकित विमान कंपनीकडून ही सेवा सुरू होत आहे. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सध्या आठवड्यातून तीन दिवसच विमानसेवा सुरू होती. ही सेवा दररोज सुरू व्हावी, अशी मागणी कोल्हापूरच्या उद्योगजगतातून होत होती; पण मुंबई विमानतळावर यासाठी स्लॉट मिळत नसल्याने त्यात अडचणी येत होत्या.अखेर १ ऑक्टोबरपासून स्टार एअर कंपनीने ही सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. १ ऑक्टोबरपासून सातही दिवस ही विमान सेवा सुरू राहील, अशी माहिती महाडिक यांनी दिली. या विमानसेवेमुळे व्यापारी, उद्योजक, कलाकार, खेळाडू अशा सर्वांचीच मोठी सोय होणार आहे.

सकाळी विमान कोल्हापुरात येईल आणि परत मुंबईला जाईल. त्यामुळे दिवसभरातील मुंबईतील कार्यालयीन कामे करणे सर्वांनाच सोयीचे ठरणार आहे. आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा सुरू होत असल्याने, निश्चितच कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

विमानाच्या वेळा अशा

रोज सकाळी साडेनऊ वाजता मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने विमान झेपावेल. सकाळी साडेदहा वाजता ते कोल्हापुरात येईल. त्यानंतर दहा वाजून पन्नास मिनिटांनी, कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने उड्डाण करेल आणि अकरा वाजून पन्नास मिनिटांनी विमान मुंबई विमानतळावर उतरेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने